Sunday, August 10, 2008

तळगड / घोसाळगड





रविवारी ६ जुलै ला आम्ही शिवस्पर्श चे काही सभासद तळगड आणी घोसळगड ची भटकंती करून आलो. पुण्यावरून साधारणपणे १४०-१६० किमी च्या टप्प्यातिल हे दोन्ही किल्ले असुन रायगड जिल्यातील रोहा गावापासून १५-२० किमी वर आहेत. सकाळी ७ ला पुणे सोडले, पिरंगुट, पौड, मुळशी मागे टाकत ताम्हिणीच्या घाटात प्रवेश केला. रस्त्यावर ढग उतरल्यामुळे १०-१२ फुटांवरचे सुद्धा निट दिसत नव्हते. मधुनच पावसाची जोरदार सर पडून जात होती. लहानमोठे असंख्य धबधबे कोसळत होते. पाण्यामुळे जास्तच काळपट दिसणारा कातळ आणी त्यावरून फेसाळत कोसळण-या जलधारा पाहुन तिथेच थांबुन त्याकडे पहात रहावे वाटे. पण पुढे जायचे होते, त्यामुळे परत कधितरी येऊ अशी स्वतःची समजूत घालुन पुढिल मार्गक्रमण सुरु ठेवले.

माणागाव पासुन मुंबईच्या दिशेने जाताना इंदापूर नावचे एक गाव लागते, तिथुन तळे गावकडे जाणारा रस्ता पकडला. वाटेत जाताना एका तळ्यात असंख्य कमळाची फुले दिसली, तिथे थांबुन त्यांचे काही फोटो घेतले. पुढे अर्ध्या तासच्या प्रवासानंतर तळे गावात पोहोचलो. खरे तर त्याचा थोडे आधीपासुनच तळगड दिसू लागतो. किल्ल्याचा समोरील बाजुने गावाचा विस्तार बराच आहे. गावामधे थोडी चौकशी करून किल्ल्यावर जाणा-या वाटेबद्दल माहिती करून घेतली. दोन शाळकरी मुलेही आमच्या बरोबर वाट दाखवण्यासाठी वरपर्यंत येण्यास तयार झाली.

पायथ्यापासुन गडाची उंची फारशी नाही, तरी दडी मारून बसलेला पाऊस, कडक उन आणी कोकणातले दमट हवामान ह्यामुळे थोडेसे चढल्यावर घामाघूम झालो. एके ठिकाणी उभ्या कातळावर कोरून काढलेली हनुमानाची मुर्ती दिसते, तिथेच सिंहाचे एक शिल्प सुद्धा दिसते, त्यावरून पुर्वी ह्या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा. इथे तुम्ही पहिल्या तटबंदीमधे प्रवेश करता. थोडे वर चढुन गेल्यावर आजुन एक तटबंदी आणी बुरुज आहे. तटबंदीचा हा भाग ब-यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. ह्या किल्ल्याला तटबंदिचे एकूण तिन पदर असुन तिस-या तटबंदितुन आपण गडावर येउन पोहोचतो. ज्या ठिकाणी पोहोचतो तिथेच सदरेच्या इमारतीचे कोसळलेले अवशेष शिल्लक आहेत. ढालकाठी चा जागेवरुन खालील संपुर्ण गाव नजरेच्या टप्प्यात येते. किल्ल्याची लांबी - रुंदी तशी फारशी नाही. पाण्याचा ५-७ अश्या सुंदर टाक्या खोदून काढलेल्या आहेत. एका पडक्या वाड्याचे अवशेष दिसतात. गडाची माची मात्र भक्कम तटबंदीने बांधुन काढलेली आहे. तटबंदीवरून चालत माचीच्या शेवटच्या टोकावर जाऊन पोहोचलो. तिथुन खाली डोकाऊन पाहिले तर गडाच्या निर्मितीच्या वेळेस एक महत्वाची गोष्ट पाळली जाते ती म्हणजे किल्ल्याला लागून जर एखादी डोंगर रांग असेल तर त्या पासुन किल्ला वेगळा केला पाहीजे. इथेही खालील डोंगररांगेचा बराच भाग फोडून वेगळा करण्यात आला आहे, जेणे करून तेथुन वर हल्ला करणे अवघड होईल. माचीवरून खाडीचा परीसर आणी खाडीच्या समोरील घोसाळगड दिसतो. १६४८ मधे शिवाजीमहाराजानी हे दोन्ही किल्ले जिंकून घेतले. त्या नंतर इंग्रजांनी १८१८ मधे हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. थोद्या विसाव्यानंतर घोसाळगडाच्या दिशेने वाटचाल सुरु केली, रोह्याच्या दिशेने १० किमी गेल्यावर आपण घोसाळगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचतो.

गडावर जाण्यासाठी पायथ्याला असलेल्या गणेशमंदिराला वळसा घालून गेलेली वाट पकडली. तळगड पेक्षा येथे जरा जास्त झाडी आहेत, तर चढाई फारशी अवघड नाही पण अनेक पायवाटा इतस्ततः फिरवतात. गडाच्या माचीखाली येऊन पोहोचलो. तिथे दगडात खोदलेल्या काही पाय-या शिल्लक आहेत. पुर्णपणे कोसळलेल्य दरवाजातून आपण माचीवर प्रवेश करतो, त्या ठिकाणी दरवाजावर असणारी सिंहाची शिल्पे तिथे पडलेली अढळली. माचीवरून विरुद्ध बाजुला उतरण्यासाठी एक चोरदरवाजा आहे, बाजुलाच पाण्याचे टाके आहे. माचीवरून बालेकिल्ल्यावर जाणारी वाट पावसाने वाढलेल्या गवत आणी झाडा-झुडपांमुळे शोधणे अवघड आहे. माचीवरून डाव्या बाजुने बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. जाताना पाण्याची तिन सुरेख टाकी लागतात, टाक्यामधे छोटे मासे असून एका टाक्यात कोणीतरी कमळाची रोपे टाकली आहेत. त्या शिवाय आणखी काही पाण्याची टाकी आहेत. माथ्यावर एका झाडाला भगवा लावला होता. बालेकिल्यावर सुद्धा लहान मोठी झाडे भरपूर वाढली आहेत. किल्ल्याचा विस्तारही तसा खुप लहानसाच आहे. बालेकिल्ल्यावरील हिरवळीवर बैठक मारली बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थंवर ताव मारला. उतरण्यास सुरुवात केली. मातीची उभी उतरण उतरताना घसरगुंडी करतच खाली उतरलो, की पाठीमागून कपडे पार चिखलमातीने बरबटून गेले. संध्याकाळ होत आली होती त्यामुळे तिथुन जवळच असणारे साळव चे बिर्ला मंदिर पहाण्याचा बेत रद्द करावा लागला. पुण्या-मुंबईहुन येयचे असल्यास पुण्याहून रोह्याला यावे लागेल. तिथुन पुढे मात्र स्थानिक वहातूक व्यवस्थेवरच अवलंबुन रहावे लागते. तसेच मुंबईहून येणा-यासाठी कोंकण रेल्वे आणी एस. टी. बसची रोह्या पर्यंत सोय आहे.