Saturday, June 26, 2010

काळदुर्ग आणि ठाण्यातले काही भुईकोट किल्ले

उन्हाळा संपत आला होता आणि बरेच दिवस ट्रेक झालेला नव्हता. शनिवारी अचानक जीएस ने फोन करून सांगितले आज रात्री आपल्याला ट्रेक ला जायचे आहे ८ वाजता पुणे सोडायचे आहे. मी त्यावेळेस पुण्याबाहेर होतो माझी काहीच तयारी नव्हती, कॅमेराचे सेल सुद्धा पुर्ण चार्ज करायला वेळ मिळाला नाही. घरी ६ वाजता पोहोचलो मग थोडा उशीर होईल असे सांगुन मिळालेल्या वेळात टॉर्च आणि सेल चार्ज करून घेतले. जीएस, आरती, तात्या , सुभाष आणि मी असे पाच जण ठाण्याच्या दिशेने निघालो. ९ वाजत आले होते. वाटेत एक्स्प्रेस वे वर जेवण केले आणि पुढचा प्रवास सुरु केला.
काळदुर्ग चा किल्ला मनोर मार्गे पालघर ला जाण्यासाठी च्या रस्त्यावर आहे. रात्री वाघोबाच्या खिंडीत पोहोचलो तोवर १ वाजला होता. एकदम सामसूम होते, वाघोबाच्या मंदिरात पथा-या पसरण्याच्या तयारीत आम्ही होतो, पण तितक्यात दोन लोक दुचाकीवर तिथे पालघर च्या दिशेने आले त्यांनी आपापसात काहीतरी चर्चा केली आणि मग आमच्या कडे वळाले. त्यांनी सांगितले की ही जागा मुक्कामासाठी अतिशय अयोग्य आहे. लुटमारीचे प्रकार इथे होतात, तर तुम्ही पालघरात जाऊन कोणात्याही लॉज वर मुक्काम करावा. मग नाईलाजाने पालघर गाठले त्या लोकानी सांगितलेले काही लॉज शोधत असताना ते दुचाकीस्वार परत आमच्यापाशी आले आणि एक लॉज चा रस्ता सांगितला. जी ठिकाणे सांगितली होती तिथे खोल्याच उपलब्ध नव्हत्या आणि तोपर्यंत रात्रीचे ३ वाजले होते. पालघराकडे येताना घाट ओलांडल्यावर काही शेड तात्यांनी पाहिल्या होत्या. तिथे गेलो तर कोणत्यातरी हॉटेलची शेड होती ती, ओसरीतली लाईट चालू होती आणि रस्त्याच्या बाजूने भिंत आणि एक मोठा पार होता त्यामुळे चांगला अडोसा सुद्धा होता आणि प्रश्ण दोनच तासांचा होता त्यामुळे मग कसलाही विचार न करता तिथेच पसरलो. रात्री हवेत ब-यापैकी गारवा होता त्यामुळे छान विश्रांती झाली. सकाळी साडेपाच सहाला तात्यांनी नेहमीचे महत्वाचे काम केले आम्हाला झोपेतून उठवण्याचे. लगेचच तिथुन परत खिंडीत पोहोचलो. सकाळची कामे उरकून घेतली.

वाघोबाचे मंदिर तसे ऎसपैस आहे, त्या मंदिराला लागुनच एक छोटेसे दुकानसुद्धा आहे तिथे ठंड सरबत, वेफर्स अश्या गोष्टी मिळतात. दुकान नुकतेच उघडले होते तिथल्या माणासाला गडावर जायचा रस्त्याची विचारपुस केली तेव्हा थोडे अंतर आमच्या पर्यंत येऊन रस्त्याबद्दल मार्गदर्शन केले. डोगराच्या ह्या भागात दाट झाडी आहे त्यामुळे त्यातून वाट काढताना चुकण्याची शक्यता आहे त्यात करवंदाच्या जाळीने काही ठिकाणी पायवाट झाकून टाकलेली आहे. त्यामुळे त्यातुन वाट काढताना करवंदाचे काटे त्यांचे काम करतात, जपुन जावे लागते. कोकणातली हवा आणि त्यात दाट झाडी त्यामुळे घामाच्या अक्षरश: धारा वहात होत्या. एका मोकळ्या कातळाचा सपाट भाग ओलांडुन आपण डोंगराच्या दुस-या रांगेवर म्हणजेच गडाच्या मागच्या बाजुला येऊन पोहोचतो. तेथुन गडाची योग्य पायवाट पकडावी लागते आम्हिही थोडे भरकटलोच पण वेळीच लक्षात आले. थोडा खडा चड चढुन गेल्यावर गडाच्या कातळकड्यापाशी येऊन पोहोचलो. इथे परत थोडी खडी चढण आहे आणि वाट सुद्धा घसा-याची आहे.
वर पोहोचल्यावर एक केवळ पाया शिल्लक असलेली दगडी भिंत दिसते. मग एक पाण्याची खोदीव टाकी, थोडे आजुन पुढे गेल्यावर ७-८ पाय-या चढल्या की गडाच्या माथ्यावर पोहोचतो. वरती आता पाण्याच्या खोदीव टाक्यांखेरीज काहीच नाही आणि टाक्यामधे पाणी नाही. गडाचा आकार पहाता मोक्याच्या जागेवर असलेली एक सुसज्ज चौकी एवढाच उपयोग केला जात असावा. कोकणातून देशावर येणा-यावाटेवर असल्यामुळे त्याला महत्व आहेच. तसेच ह्या किल्ल्याच्या सोबतीने असावा आणि तांदुळावाडी हे आजुन दोन किल्ले ह्या परिसरात आहेत. माथ्यावरून पालघर चा संपुर्ण परिसर नजरेत भरतो. हवा चांगली असेल तर समुद्रदर्शनही होऊ शकते.






बरोबर नेलेल्या भेळ चिवड्याची न्याहारी केली किती वाजले पाहिले तर आत्ताशी ९.३० च वाजले आहेत मग लगेच परतायचे छे. तिथे आजुन काहीवेळ थांबुन ११ पर्यंत खिंडीत पोहोचलो, घामाच्या धारांनी हैराण केले होते. मग मंदिराच्या प्रांगणातच पसरलो तर तिथे वर्दळ सुरू झालेली गावातून नवदांपत्यांची व-हाडी मंडळीची तिथे गर्दी वाढू लागली त्यामुळे तिथुन निघालो. थेट शिरगाव गाठले.

शिरगावचा किल्ला हा भुईकोट ह्या प्रकारात मोडणारा किल्ला आहे. तर किल्ल्यावरून समुद्र किनारा एकदम जवळ आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार प्रशस्त असुन भक्कम आणि २५-३० फुट उंचीची तटबंदी आणि बुरूज आहेत. आतली जागा सुद्धा बरीच मोठी आहे. आतमधे विशेष बांधकामे शिल्लक नाहीत. तटबंदीवर काही घुमट असुन तेथुन सभोवतालचा परिसराचे निरिक्षण करता येते. आम्ही गेलो तेव्हा आतमधे कोणत्यातरी भोजपुरी चित्रपटाचे शुटिंग चालू होते. त्यामुळे किल्ल्याचा एक भाग त्यांनी व्यापला होता आणि तिथे जाता येत नव्हते. भर गावात किल्ला असल्यामुळे किल्ल्याची निगा-दुरुस्ती केली जात असल्याचे दिसते.







आत्ताशी १२.३० च वाजले होते. भुकेची जाणिव झाली होती तरीपण एवड्या लांब आलोच आहोत तर मग तिथुन जवळ असलेला माहिमचा भुईकोट का सोडावा. माहिमचा किल्ला / गढी पाशी पोहोचलो. २०-२५ पुट उंचीची भक्कम तटबंदी. तटबंदिवर जाणारा जिना एवढेच तिथे शाबुत आहेत आत एक कोरडी विहिर दिसली. तटबंदीवरून लांबवर समुद्रकिनारा दिसतो. आता मात्र कडाक्याची भुक लागली होती मग चांगल्या हॉटेल चा शोध घेत केळव्याला पोहोचलो. इथे विसावा नावाचे एक चांगले हॉटेल आहे शाकाहारी-मांसाहारी दोन्हीप्रकारचे थाळी स्वरूपातले उत्कृष्ट आणि पोटभर जेवण मिळते. हॉटेलचा चालक तुम्हाला सांगतोच पोटभर जेवल्याशिवाय जायचे नाही म्हणुन. जेवण चांगले होते.






केळव्याला दोन कोट आहेत एक किना-यावर तर दुसरा थोडा समुद्रात. आम्ही पोहोचलो तेव्हा नेमकी भरतीची वेळ सुरू झाली होती त्यामुळे समुद्रातील किल्ल्यावर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. दुसरा किल्ला जो किना-यावर आहे त्याला किल्ला किंवा गढी का म्हणावे असा प्रस्णच पडतो, इतका त्याचा आकार लहान आहे. आदमासे १००० चौ. पुट सुद्धा नसेल.








माहिम आणि केळवा हा किनारपट्टीचा भाग पौर्तुगीज अमलाखालील होता त्यामुळॆ त्यानी बांधकाम केलेले हे किल्ले तिथल्या बांधकामाचे स्वरूप हे त्यांच्या पद्धतीचे आहे.

आता गडाच्या इतिहासाबद्दल माहिती जमा करतो आहे. लवकरच ती इथे लिहिन.

Thursday, June 24, 2010

dhivar

आठवली आठवली
तळ्याकाठी गाती लाटा
लाटांमधे उभे झाड
झाडावर धीवराची
हाले चोच लाल जाड
शुभ्र छाती पिंगे पोट
जसा चाफा यावा फुली
पंख जणु थंडीमध्ये
बंडी घाले आमसुली
जांभळाचे तुझे डोळे
तुझी बोटे जास्वंदीची
आणि छोटी अखेरची पिसे जवस फुलांची
गड्या पाखरा तु असा
सारा देखणा रे कसा
पाण्यावर उडताना नको मारु मात्र मासा