शनिवारी-रविवारी भारत इतिहास संशोधक मंडळाने रायगड च्या अभ्यास ट्रेक ची आखणी
केली होती, तर गिरीदर्शन क्लब कडे ट्रेक च्या व्यवस्थापनाचे काम दिले होते. पुण्यातून
निघताना १२.३० वाजता जायचे ठरले. १२.३० ची वेळ ठरवल्यामूळे शनिवारी ऑफिस सुटल्यावर
घरी येउन बॅग आणि ट्रेक ची पुर्व तयारी करायला वेळ मिळणार होताच. शनिवारी दुपारी १२
वाजता सतिश मराठे (गिरीदर्शन चे संचालक) यांनी फोन करुन विचारले. "तुम्ही आज ट्रेक ला
येणार आहात ना ??" मी हो म्हटले,"किती वाजेपर्यंत पोहोचणार आहात ? मी तुमची वाट
पहात आहे. बाकी सगळे लोक जमले आहेत." मला एकदम काही कळलेच नाही. त्याना परत
विचारले आपण आज रात्री जाणार आहोत ना ??, त्यावर मराठे म्हणाले, " आपल्याला रात्री
नाही तर आत्ता दुपारी १२.३० वाजता निघायचे आहे, तर तुम्ही किती वाजे पर्यंत येथे
पोहोचणार आहात". मग नाईलाजाने मी येत नाही असे कळवले. थोडा शांतपणे विचार केला,
रायगडला तर जायचेच होते. मग बाईक वर जाण्याचे ठरवले. सोबत माझा मावसभाऊ सुशांत ला
नेण्याचे ठरवले. ऑफिस मधुन लगेच परवानगी घेऊन घरी गेलो, जमेल तशी बॅग भरली आणि २.३०
वाजता सुशांतच्या घरी पोहोचलो. बाहेर भयंकर उन होते त्यामुळे थोडे उशीरा निघण्याचे ठरवले.
सायंकाळी ५.३० ला घर सोडले. आता रात्री पोहोचायला उशीर होणार होता, बरोबर चटणी
पोळी घेतली होती पण तेवढे पुरेल असे वाटले नाही म्हणुन पौड जवळ काही खाद्य सामग्री
खरेदी केली. मराठे यांना फोन करून आम्ही येत असल्याची कल्पना दिली. मुळशी - डोंगरवाडी
- ताम्हीणी - विळे - कोलाड मार्गे १०.३० पर्यंत माणगाव येथे पोहोचलो. माणगावच्या पुढे
एका रायगड दर्शन नावच्या ढाब्यावर थांबलो बरोबर नेलेली पोळ्या, दही, बुंदी आणि
ढाब्यावरील शेवभाजी आणि वाफाळलेल भात असा झकास बेत जमला. जेवण झाल्यावर हॉटेल
मालकाबरोबर बराच वेळ महागाई, राजकारण, मराठी माणुस पासुन रायगड अश्या अनेक
विषयांवर गप्पा मारल्या, त्यांनी सांगितले की जगदीश्वराच्या पुजेसाठी दर रविवारी काही
लोक नियमीतपणे सांगलीहुन पुजेसाठी येत असतात. आजुन पुढचा बराच प्रवास बाकी होता, मग
त्यांच्या निरोप घेतला. पुढे महाड ला पोहोचलो तेथुन रायगड २४ किमी वर आहे. हमरस्ता
सोडला तसे रहदारी पुर्ण संपली. तिन चार किमी नंतर एखादे वहान दिसत होते. लग्नसराईचे
दिवस होते त्यामुळे एका वस्तीमधे मध्यरात्री लग्नाची वरात चालु होती. १२.३० पर्यंत
रायगड चित दरवाजा जवळ पोहोचलो. काही दुचाकी तिथे उभ्या होत्या त्यात आमचीसुद्दा
गाडी लावून टाकली. बॅगा भरताना टॉर्च घ्यायची विसरलो होतो आणि अष्टमीचा चंद्र काही
उगवला नव्हता. गडाच्या रस्त्याची थोडीपार कल्पना होती त्यामुळे १०-१५ मिनीटे विश्रांती
घेउन गड चढायला सुरवात केली. खुबलढा कोटगुल्माच्या बाजूने पाय-यांच्या वाटेने जाताना
फारसा त्रास होत नव्हता, पण वारा लागतच नव्हता त्यामुळे घामाच्या धारा वाहु लागल्या
होते. मग थोडे पुढे उंचीवर डोंगराचा आडसर नव्हता अश्या ठिकाणी वा-याची झूळूक मिळायची.
विजेरी नव्हती म्हणून फारशी अडचण वाटत नव्हती. गरज वाटल्यास ते काम मोबाईल च्या
लाईटच्या सहाय्याने भागवले. गडाच्या कातळ भिंतीच्या जवळ पोहोचलो. जरा सपाटीची
कॉक्रिट टाकुन तयार केलेली वाट लागली तिथेच अर्धातास झोप काढली मग बरे वाटले. पावणे
दोन वाजता परत चालायला सुरवात केली. पावणेतिन च्या सुमारास भव्य अश्या कोटगुल्मांचे
संरक्षण असलेला महादरवाजापाशी येऊन पोहोचलो. महादरवाज्याची रचना पहाण्यासारखी आहे.
दरवाज्यातुन आत वळुन परत पाय-यांची चढण लागते. ती पार केल्यावर आपण हात्ती तलावाच्या
समोर येऊन पोहोचतो. गडावर जिल्हापरिषदेने बांधलेले विश्रामगुह आहे. त्याचा लाईट चालू
होता त्यामुळे त्या दिशेने गेलो. तिथे नव्याने काही खोल्या बांधुन काढल्या आहेत तर काही
लोखंडी शेड बांधल्या आहेत. पत्र्याच्या बंदिस्त जागेत काही मंडळी गाढझोपेत होती. त्याना
त्रास न देता बाहेरच्या जागेत आम्ही झोपलो. सकाळी थंडी भयंकर थडी वाजु लागली त्यामुळे
दोघांचीही झोपमोड झाली, सकाळाचे ५ वाजले होते. मग परत झोपायचा प्रयत्न केला पण
गारव्यामुळे झोप काही लागली नाही. ५.४५ ला उठलो. काही मंडळी आजुनही झोपलेली होती.
आम्ही आवरून सूर्योद्य पहाण्याच्या उद्देशाने गडावरील नगारखान्याच्या बाजुला असलेल्या उंच
टेकाडावर जाऊन बसलो. वातावरण ढगाळले होते, पण नेमक सूर्योद्य होण्यापुर्वी सगळे ढग
बाजूला झाले, आणि त्यातच जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजुने उगवत्या सूर्याचे दर्शन झाले.
काही वेळ तिथूनच गड न्याहाळत बसलो आणि विश्रामगृहाकडे गेलो, तो पर्यंत बाकीची मंडळी
आवरून तयार झालीच होती. चांदोरकर काका जगदीश्वराच्या मंदिरामागे असलेल्या
शिवस्मारकापाशी जाऊन पोहोचले होते. सगळे जमल्यावर त्यानी गडाची माहिती देण्यास
सुरुवात केली.
गोपाळ चांदोरकर हे आर्किटेक्ट असून त्यांनी गडावरील प्रत्तेक इमारतींचा स्थापत्यशास्त्रचा
आधार घेऊन अभ्यास केला होता. अनेक इमारतींचे त्याच्या शिल्लक राहिलेल्या बांधकामाची
मोजमापे घेऊन त्याचे नकाशे त्यांनी बनवले आहेत. त्या नुसार ती इमारत काय असावी ह्याचा
बरोबर अंदाज लावता येऊ शकतो. जगदीश्वर मंदिरापासून पुढे असलेल्या गडाच्या पुर्व भागात
गडावरची मुख्य सैन्य छावणी होती. तर दोन दारूगोळा कोठारे ह्याच भागात दिसतात. हा
किल्ला फार प्राचिन असून तो सातवहान काळापेक्षाही जुना असल्याच्या खुणा इथल्या प्रत्तेक
तळ्यात सापडतात. यादव राजवटीच्या समाप्ती नंतर येथे बहामनी मुस्लिम राजवटीची सत्ता
सुरु झाली तेव्हा त्या काळात त्यांनी गडावरील सर्व मंदिरे फोडली आणि त्या जागी दर्गा -
मशीदी बांधल्या. शिवाजीराजांनी हा गड घेतल्यावर पुन्हा त्या ठिकाणी मंदिर अधवा इतर
बांधकामे केली, त्यातलेच एक बांधकाम म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मग चांदोरकर आम्हाला कोळेम
तलावाकडे घेवून गेले. तळ्याचे निट निरीक्षण केले असता पुर्वी तिथे असलेल्या लेण्यांचे अवशेष
दिसतात. तलावातले पाणी बरेच कमी असले तरी पिण्यासाठी मुख्यत्वे याच पाण्याचा वापर
केला जातो. ह्या किल्ल्यावर नैसर्गीक पाण्याचा स्त्रोत नाही त्यामुळे गडावर ह्या प्रकारे
तळी बांधून काढली आहेत. गडावर तळे असण्याचे आणखी एक कारण म्हणजे गडावरील
बांधकामासाठी लागणारा दगड खोडुन काढल्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवता येईल
अशी व्यवस्था केली जाते. मग सध्या जी बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते त्या इमारतींपाशी
पोहोचलो. ही बाजारपेठ नसून स्वराज्य कारभारातील वेगवेगळ्या विभागांच्या असलेल्या कचे-या
आहेत. बाजारपेठ ही गडाच्या इतक्या उंचीवर असण्याचे कारणच नव्हते, कारण गडावर रहाणारे
लोक हे मुख्यत्वे करून सैन्यातील काम करणारे मुख्य अधिकारी आणि गडाचे संरक्षणासाठी लागणारे
निवडक सैन्य आणि त्याच्या सुविधा पुरवणारे बलुतेदार यांचाच वावर असे. सामान्य नागरीक हे
गडाखाली असणा-या गावात रहात असत. सामान्य नागरीक जर गडाखाली रहात असेल तर
इतक्या वर केवळ बाजारहाटासाठी तो येणे शक्य नाही. बाजार पेठेत एकुण २२+२२ अशी ४४
दालने असल्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्षात ती २२+२१ अशी ४३ दालने आहेत. तिथुन पुढे
होळीचा माळ हा ठिकाणी गेलो, तिथे शिवाजीमहाराजांचा सिंहासनारूढ पुतळा स्थापन केला
आहे. मग सकाळची न्याहारी करून हात्तीखाना म्हणुन सांगितली जाते त्या इमारतीकडे गेलो पण
त्याला कुलूप लावले होते. त्याचा दरवाजा एवढा लहान होता की हात्ती आत जाणे शक्य
नाही. चांदोरकर त्या इमारतीला नाट्यशाळेची इमारत असे म्हणतात, नाट्यशाळे प्रमाणेच
आतली रचना आहे. हात्ती हा प्रकार महाराजांच्या सैन्यात नव्हता. नाट्यशाळेच्या जवळच
शिर्काई देवीचे मंदिर दिसते. तिथुन पुढे कुशावर्त तळ्याच्या बाजुला गेलो तिथे एक दगडी
बांधकाम दाखवले, सध्या त्याला तुपाचे टाके म्हणुन सांगितले जाते. पण चांदोरकर म्हणतात की
तुपाची साठवण हवा लागणार नाही अश्या जागी केलेली असते, त्या खोलीत तळ दगडी टाक्या
प्रमाणे असून छताला झरोके आहेत, कौटील्या अर्थशास्त्राच्या आधारे त्यांनी ते टाके असलेली
खोली म्हणजे इसवीसन पुर्व काळातले पर्जन्यमापनाचे यंत्र असावे. कुशावर्त टाक्यात असलेल्या
लेण्या पाहिल्या तसेच पाण्याला बांध म्हणुन घातलेली भिंतीच्या मागील बाजूस उतरून तिथे
असलेले गोमुख त्यांनी दाखवले. त्याचा उपयोग तलावात आलेला गाळ वाहून जावा अशी त्याची
रचना केली आहे. कुशावर्त तळ्याच्या बाजूला एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात. जोत्यावर
मुख्य इमारत असून दोन खोल्या असलेले घर तिथे आहे. भोवताली मोकळी जागा असून काही अंतर
सोडून त्या घराला दगडी-विटांचे कुंपण घातले आहे. अश्या प्रकारची रचना असलेली अनेक घरे
गडावर आढळतात. मग आम्ही गडावरची मुख्य इमारत म्हणजे राजवाड्याच्या नगारखान्यापाशी
पोहोचलो. नगारखान्याची इमारत पुर्णतः शाबुत आहे. दरवाज्याच्या वरच्या भागात दोन
शिल्पे कोरलेली आहेत, त्यात एका सिंहने आपल्या चारी पायाखाली एक एक हात्ती धरला आहे
आणि शेपटीने एका हात्तीला उचलले आहे. चांदोरकरांनी त्याचा अर्थ सांगीतला की " जो पाच
हात्तीना पराभुत करु शकतो, त्यांच्यावर जरब बसवू शकतो अशी त्या सिंहासारखी प्रबळ सत्ता
इथे नांदत आहे". नगारखान्यातून आपण राजवाड्यात प्रवेश करतो, डाव्या हाताला मधोमध एका
बांधकामाचे जोते दिसते, ती जागा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ठिकाण होय,
त्यालाच दिवाण-ए-खास म्हणले जाते. ज्या ठिकाणी राजांना सप्तनद्यांचे स्नान घातले त्या
न्हाणिघराच्या खुणा तिथे दिसतात. आणि ज्या ठिकाणी सध्या आठ खांबी छत्र बसवले आहे ते
ठिकाण म्हणजे दिवाण-ए-आम. चांदोरकार काकांनी विचारले की ह्या जागेकडे बघुन इथे
शिवकालापुर्वी काय असावे ?. आम्ही निरुत्तरच होतो. पण त्यांनी सांगितलेले की हे ठिकाण
म्हणजे बहामनीकाळातली एक मशीद / दर्गा होती आणि ज्या जागी दिवाण-ए-आम मधे
महाराजांनी सिहासन ठेवले होते त्या खाली एक कबर आजुनही आहे. पण मशीदीच्या पुर्वी त्या
जागी वडेश्वराचे मंदिर होते जे बहामनी सुलतानंच्या काळात उद्वस्त करण्यात आले होते,
त्याचेही अवशेष चांदोरकरांनी दाखवले. इंग्रजांनी जेव्हा गडावर हल्ला केला तेव्हा त्यांनी
डागलेला एक तोफगोळा दिवाण-ए-आम च्या मागच्या भिंतीवर पडला पण तो फुटला नाही, तर
त्यातल्या पेटत्या दारूचा फवा-यामुळे तिथला एक दगड वितळला ते चांदोरकरांनी दाखवले.
दरबाराच्या मागच्या बाजूला राजांचा खाजगी महाल, राण्यांचा खाजगी महाल, राण्याचे
न्हाणिघर, स्वयंपाक घर, धान्य कोठार, ६ कचे-या (ज्याला तिथले गाईड राजांच्या सात
राण्यांचे सात महाल असे सांगतात.), एकदम आंधा-या जागी जमीनीखाली असलेली रत्नशाळा,
राजांची खासबाग ( राजवाड्यातील वाया जाणारे पाणी पाटबांधून ह्या खासबागेत आणुन
सोडल्याचे दिसते), पालखी दरवाजा, स्थंभ / मनोरे हे पुर्वी किती मजल्याचे होते हे सांगता
येणे अवघड आहे तरी ते तिनच मजली असावेत असे चांदोरकरंचे म्हणणे आहे. मनो-यामधे दुस-या
मजल्यावर आपण जाऊ शकतो. तिथे पुर्वी कारंजे असल्याच्या खुण दिसातात. मनो-याचे नक्षीदार
बांधकाम पहाण्यासारखेच आहे. पुढे गंगासागर तलावात उतरलो. तळाच्या दगडावर मोट्या खाचा
पाडल्याचे दिसले त्या म्हणजे बांधकामासाठी पुर्वी कश्या प्रकारे दगड मिळवला जात असे हे
आपल्याला समजते. मग महादरवाज्याचे वरूनच निरीक्षण केले. हात्ती तलावाच्या वरच्या बाजूला
एक लोखंडी खांब उभा दिसतो तो खांब म्हणजे सातवहान कालीन वेळ मोजण्याचे यंत्र असल्याचे
चांदोरकरांनी सांगितले. दुपारचा एक वाजत आला होता. मग देशमुख खानावळीत जाऊन जेवण
केले. २ वाजता परतीच्या प्रवासाला निघण्याची वेळ मराठेंनी ठरवली होती. मी आणि सुशांतने
रोप-वे ने खाली उतरण्याचा अनुभव घेण्याचे ठरवले. खाली उतरण्यासाठी ७५/- रूपये इतके
तिकीट असुन जाण्या येण्याचे तिकीट १५०/- ला तर केवळ वरती येण्यासाठी १००/- तिकीट
आकारले जाते.
लहान मोठी अनेक चाके तिथे दोरीला आधार देत फिरत असतात. दोरीला खाली जाणा-या
एकामागोमाग एक अश्या दोन खाली जाणा-या व त्याच वेळेस खालून वर येणा-या दोन ट्रॉलिज
जोडलेल्या आहेत. एका ट्रॉलीमध्ये ५-६ लोक बसू शकतात. आमचा नंबर आल्यावर आम्ही सुद्धा
बसलो. जसे त्या ट्रॉली ने खाली उतरायला सुरूवात केली तसे काही क्षण एकदम पोटात गोळा
आला. पण आप्ण सुरक्षीत असल्याची खात्री झाल्यावर तिथून दिसणारे दृश्य कॅमेरात टिपले. केवळ
५ मिनीटात आपण खालई येऊन पोहोचतो. पण आम्ही आमच्या गाड्या वरच्या बाजूला लावल्या
असल्यामुळे १.५ किमी चालत चित्त दरवाजा गाठला. उन्हात तापलेली गाडी सावलीत लावून
तिथल्या दुकानदाराकडे तिथुन थेट निजामपुर / माणगाव कडे जाणा-या रस्त्यांची चौकशी केली.
पाचाड मार्गे एक रस्ता तुम्हाला थेट माणगावला अथवा निजामपुरला जाता येते. पण रस्त्याचे
काम चालू असल्याकारणामुळे ५-६ किमी चा रस्ता खराब आहे. ह्या रस्त्याने गेलो तर १५-२०
किमी चे अंतर वाचणार होते. तसेच कोलाड ऐवजी निजामपूर मार्गे गेल्यावर आजून १५ किमी
अंतर वाचणार होते म्हणुन त्याप्रमाणे पाचाडमार्गे या रस्त्याने प्रवास केला. काही अंतर पार
केल्यावर लगेचच तो रस्ता किती खराब आहे ह्याचा प्रत्यय आला. कच्च्या मातीचा तिव्र
उताराचा रस्ता तर त्यापुढे तितकाच चढ आणि भाजून काढणारे ऊन. पुढे रस्त्यावर काही फाटे
आले पण दिशा विचारण्यासाठी कोणी माणुस तिथे नव्हता त्यामुळे निजामपुर चा फाटा हुकला
आणि आम्ही माणगाव ला पोहोचलो. मग पुढे निजामपुर मार्गे विळे येथे गेलो तिथे तासभर
विश्रांती घेऊन रात्री ९ वाजे पर्यंत घरी पोहोचलो.