Tuesday, May 25, 2010

राजगड...

राजगड-

पुण्यापासून केवळ ६०-६५ किमी अंतरावर असलेला राजगड म्हणजे, एका दिवसात जाऊन गडमाथा गाठता येतो आणि तितक्याच गतीने परतता येते असे ठिकाण, बरेच लोक असेच सांगतात. पण संपुर्ण गड एका दिवसात व्यवस्थीत पहाणे केवळ अशक्यच, आणि राजगडाच्या तिनही माच्या आणि पहायचा तर कमीतकमी २ दिवसांचा मुक्काम करायला पाहीजे. पण, सध्या मोकळ्या वेळेचे गणित जुळवणे फारच अवघड झाले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्यांदा राजगड ला गेलो होतो, तेव्हा गडाचा आकार, रचना पाहुन मनाशी ठरवले की राजगड चा कानाकोपरा टप्प्या टप्प्याने का होईना पण पहायचाच आणि तेव्हा पासून ही माझी राजगडाची पाचवी भेट.

१६४६-४७ मधे तोरणा घेतल्या नंतर शिवाजी राजांनी राजगडही जिंकुन घेतला. त्याकाळी राजगडाचे स्वरूप केवळ एक टेहाळणीची चौकी म्हणुन होते, तर मुरंबदेवाचा डोंगर या नावाने ओळखला जात होता. डोंगराचा आकार त्रिकोणी असुन भौगोलीक दृष्ट्या अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. महाराजंनी गड घेतल्या नंतर तोरण्यावर मिळालेल्या धनाच्या सहाय्यने गडाचे बांधकाम सुरू केले. गडाच्या पुर्वेला पद्मावती, दक्षिणेला सुवेळा आणि पश्चिमेला संजीवनी अश्या तिन माच्या आणि पद्मावती उत्तुंग अभेद्या असा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यावर अनेक गरजेच्या इमारतीची बांधकामे केली. राजधानीचा गड असल्यामूळे गडावरील प्रत्तेक बांधकाम अतिशय सुबकतेने विचारपुर्वक करण्यात आलेले आहे. एका दिवसात हे इतके सर्व पाहुन होणे केवळ अशक्यच.

गडावर जाण्यासाठी १) पाली दरवाजा मार्गे २) गुंजवणे-चोर दरवाजा ३) अळु दरवाजा ४) गुंजवणे दरवाजा आणि आजुन एक वाट गुंजवणे गावतून सुवेळा माचीवरील मधल्या भागातून वर घेऊन येते. ह्यापैकी गुंजवणे-चोर दरवाजा आणि पाली दरवाजा हे दोन मार्ग जास्त प्रचलीत आहेत. आळु दरवाजाची वाट राजगड-तोरणा ह्यांना जोडणारी वाट आहे.

पाली दरवाजा मार्गे गडावर जायचे असेल तर पुण्याहून नसरपूर - मार्गसनी - वाजेघर मार्गे भोसलेवाडी येथे यावे. पाली दरवाज्याची वाट पाय-यांनी बांधलेली आहे आणि इतर रस्त्यांपेक्षा इथे थोडे अधिक वरपर्यंत कच्च्या रस्त्याने गाडीने वरपर्यंत जाता येते. पुढे काही अंतर कारवीच्या दाट रानातून आंगावर येणारा चढ आणि मग ३००-३५० पाय-या चढून गेल्यावर पाली दरवाजा क्र. १ च्या प्रचंड मोठ्या बुरुजापाशी येऊन पोहोचतो. दरवाज्यातून प्रवेश करण्यासाठी मात्र थोडे वळसा घेऊन जावे लागते. त्याकाळी उपलब्ध असणा-या शस्त्र-अस्त्रांपासुन दरवाज्याचे रक्षण करता येईल अशी योजना केली आहे. पहिल्या दरवाज्याने आत शिरल्यावर दोन्ही बाजूंनी तटबंदी असलेल्या मार्गने आजुन काही पाय-या चढुन गेल्यावर दोन बुरजांच्या संरक्षण लाभलेला दुसरा दरवाजा दिसतो. १५-२० फूट उंची असलेल्या दरवाज्याचे आणि बुरूजाचे बांधकाम पहाण्यासारखे आहे. दुस-या दरवाज्याने आत प्रवेश केल्यावर दरवाज्याच्या दोन्ही बाजुना सैनिकाना बसण्यासाठी ओसरी सारखी जागा आहे तिला अलंगा असे म्हटले जाते. त्यावाटेने तसेच पुढे चालत गेल्यावर एका बांधीव तळ्याजवळून पुढे जात आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो.

दुसरा आणि जास्त प्रचलीत असलेला मार्ग म्हणजे गुंजवणे-चोर दरवाजा मार्गे जाणारी बाट. तिथे जाण्यासाठी नसरापूर - मार्गसनी - गुंजवणॆ मार्गे यावे लागते. पाली दरवाज्यापेक्षा ही वाट जास्त लांबीची आहे पण तिथल्यासारखा एकदम आंगावर येणारा चढ नाही. आणि ब-याच अंतरापर्यंत झाडांच्या सावलीचा आधार मिळातो त्यामुळे चालताना जास्त दमछाक होत नाही. बराच वेळ चालल्यावर चोर दरवाज्याच्या कातळकड्यापाशी येउन पोहोचतो. इथे थोडी खडी चढण आहे पण रेलीग लावल्यामुळे सुरक्षीतपणे आपण पद्मावतीमाची वर पोहोचतो. समोर पद्मावती तळे अनेक बांधकामे आणि त्यामागे असलेला बालेकिल्ल्याचा उत्तरबुरुज नजरेत भरतो.

पद्मावती माची ही इतर दोन माच्यांपेक्षा लांबीने कमी पण रुंदीने पुष्कळ मोठी आहे. गडाच्या महत्वाच्या इमारती ह्याच माचीवर दिसतात. बारा महिने पाणि पुरेल इतका मुबलक पाणिसाठा असलेला पद्मावती तलाव. तलावाचे निट निरिक्षण केल्यास तळ्याच्या सभोवती सर्व बाजुने संरक्षक भित असली पाहिजे असे दिसून येते. तलावाच्या पुर्व आणि पश्चिम बाजुने असलेल्या दरवाज्याने तळ्यात उतरण्यासाठी असलेली वाट दिसते. तलावाच्या डाव्या बाजुला एकारांगेत अनेक खोल्या असलेले बांधकाम दिसते, गडावरील शिबंदींचे रहाण्याचे ठिकाण असावे. पुढे उजवीकडे अलिकडील काळात बांधलेले (??) यात्रीनिवास लागते, त्यानंतर एक समाधिचे बांधकाम दिसते ती म्हणजे राणी सईबाई ह्यांची समाधी होय. समोरच पद्मावती देवीचे प्रशस्त मंदिर आहे. २५-३० लोकांची मुक्कमाची सोय इथे होऊ शकते. मंदिराच्या भोवताली पाण्याची काही टाकी खोदलेली आहेत. काही टाक्यातलेच पाणी पिण्यायोग्य आहे. देवळाच्या मागील बाजुस सध्याची वापरात असलेली सरकारी कचेरी आहे. पद्मावती मंदिरासमोर रामेश्वराचे छोटे मंदिर आहे. तेथुन ढालकाठीच्या दिशेने पुढे चालताना सदर, अंबरखाना, दारुखाना इत्यादी इमारतींचे अवशेष / जोती दिसतात. पाली दरवाजामार्गे येणारी वाट या ठिकाणी येऊन मिळते.

ढालकाठीची जागा म्हणजे ध्वजाचे ठिकाण. इथुन उजवीकडे जाणा-या वाटेने संजीवनी माचीवर जाता येते, सरळ गेल्यास बालेकिल्ल्यावर जाता येईल आणि डावीकडे गेल्यास गुंजवणे दरवाजा आणि सुवेळा माचीवर जाता येते. एका दिवसाच्या रपेटीमधे पद्मावती माची, बालेकिल्ला आणि सुवेळा किंवा संजिवनी माचीची धावती भेट किंवा बालेकिल्ल्याची पुर्ण टेहाळणी करता येऊ शकते.

डावीकडील वाटेने थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या कड्यापासुन ते खालच्या तटबंदीपर्यंत बांधून काढलेली एक भिंत लागते, ज्यामुळे पद्मावती माची बालेकिल्ल्यापासून वेगळी असल्याचे भासते. डावीकडे खालच्या बाजूला गुंजवणे दरवाज्याचा बुरुज दिसतो. इथुन खाली उतरणारी वाट अवघड आणि घसा-याची आहे. या वाटेने प्रयत्नकरून गडावर आल्यास वर येणास कमी वेळ लागतो असे त्या रस्त्याने आलेले ट्रेकर्स सांगतात, शिवाय तिथल्या झाडीमधे वाट चुकण्याचीही भिती आहेच.

सुवेळा माची - सुवेळा माचीचे बांधकामाचे तिन भाग दिसतात त्यातला एक टेकडीसारखा असलेल्या भागाला डुबा असे म्हणतात. त्याच्या अडोश्याने काही इमारतींचे बांधकाम दिसते ही कदाचित गडावरील प्रमुख सरदारांची निवासस्थाने असावीत. पुढे झुंजार बुरुजावर आपण येऊन पोहोचतो. बुरजाचे बांधकाम अतिशय सुबक आणि प्रशस्त आहे. बुरुजाच्या माथ्यावरुन पाहिल्यास सुवेळा माचीची पुढे धावत गेलेली तटबंदीची रांग दिसते. वुरजाच्या उजव्या बाजुस असलेल्या दरवाज्यातुन पुढे गेल्यावर एक भिंतीत असलेली श्रीगणेशाची सुंदर मुर्ती आपले लक्ष वेधुन घेते. सुवेळा माचीचे एक आकर्षण म्हणजे हात्तीनेढे. झुंजार बुरूजाखाली असलेल्या हात्तीच्या आकारासारख्या दिसणा-या प्रचंड खडकाला मधोमध पडलेले एक नैसर्गिक छिद्र. ह्या नेढ्यामधे १०-१२ माणसे एकावेळेस बसु शकतात इतके ते मोठे आहे. सुवेळा माचीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाताना वाटेत पाण्याची काही टाकी खोदलेली दिसतात. बालेकिल्ल्यापासुन सुवेळामाचीचे टोक सुमारे दिड कि.मी. वर आहे आणि संपुर्ण माचीभोवताली ५-८ फुट उची आणि ४-५ फुट जाडीची तटबंदी पहाण्यासारखी आहे. काही ठिकाणी तटबंदीचे दुहेरी पदर दिसतात, तर काही ठिकाणी ढासळलेली आहे.

बालेकिल्ला - सुवेळा माचीवरून परत येताना बालेकिल्ल्याच्या कड्याला भिडलेली एक पायवाट दिसते त्या वाटेने पुढे गेल्यावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी डावीकडे काही पाय-या लागतात १०-१२ पाय-या चढून गेल्यावर खोबण्या कोरलेल्या कातळकड्यापाशी येऊन पोहोचतो. अतिशय उभी चढण आहे. खाचा-खोवण्या आणि लोखंडी रेलींग चा आधार घेत ५०-६० फुट चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक गुहा लागते. आणि आजून थोडे चढून गेल्यावर बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. महाद्वार प्रशस्त आणि १५-२० फुट उंचीचे असून दोन्ही बाजूला सुबक बांधकाम केलेले अष्ट्कोनी बुरुज आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर तिथल्या पाय-यांवर एक छोटी विश्रांती घ्यावीशी वाटते दरवाज्यातून सुवेळामाचीचे दिसणारे द्रुश्य आणि भन्नाट वारा काही क्षणात तुमचा थकवा दुर करतो. बालेकिल्ल्यातून आत प्रवेश केल्यावर समोर दिसते ते जननी मातेचे मंदिर. उजव्या हाताला गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी रस्ता आहे त्याने वर गेल्यावर अर्धगोलाकार असे चंद्रतळे दिसते. त्यापुढे गडाचे मुख्य दैवत म्हणजे मुरंबदेव म्हणजेच ब्रम्हऋशींचे छोटेसे मंदिर लागते. मंदिराच्या आजुबाजूला निट पाहीले तर असंख्य पाण्याच्या टाक्या खोदलेल्या दिसतील. तिथुन पुढे आपण उत्तर बुरूजावर येउन पोहोचतो. वरून संपुर्ण पद्मावती माची ते सिंहगडापर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. उत्तर बुरुजातुन पद्मावतीमाचीवर उतरण्यासाठी एक गुप्तदरवाजाची वाट आहे. पण ती दगड टाकून बंद करण्यात आलेली आहे. उत्तर वुरूजावरून पश्चिम बुरुजावर तटबंदीच्या बाजुने जाणारी वाट आहे. त्यावरुन जाताना खाली दिसणारी पाली दरवाज्याची रचना लक्षात येते. पश्चिम बुरुजावरून डोकावले असता सुवेळा माचीप्रमाणेच लांबपर्यंत पसरलेली अतीशय रेखीव सुबक बांधकाम असलेली संजिवनी माची आणि त्यापुढे तोरण्यापर्यंतचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. पश्चिम बुरूजावरून दक्षिण बुरूजावर जाताना बालेकिल्ल्यावरील महत्वाच्या बांधकामांचे बहुदा महाराजंच्या निवासस्थान आणि कुटुंबातील अन्य लोकांच्या महालाचे अवशेष दिसतात काहींच्या संपुर्ण भंती आहेत तर काहींच्या अर्ध्या तर काहींची नुसतीच जोती शिल्लक आहेत तर काहीची अलिकडच्या काळात थोडी दुरुस्ती करण्यात आली आहे. राहीलेल्या अवशेषांवरून तेथे पुर्वी असलेल्या इमारतीच्या रचनेचा पुरेसा अंदाज लावता येईल. एका वाड्याच्या मागील बाजुस त्या काळी वापरात असलेले शौचकूप दिसतात. तिथेच एका बांधकामाला बाजारपेठ अशी अलिकडच्या काळात लावलेली पाटी दिसते. अनेक लोकांनी राजगडाच्या बालेकिल्ल्यावर बाजारपेठ असल्याचा उल्लेख करतात पण मनाला ते पटत नाही. असो. बालेकिल्ल्याचा परिसर तसा फारसा मोठा नाही १ ते २ तासामधे बराचसा भाग पाहुन होतो. दक्षिण बुरुजावरून पुढे चालत आपण परत महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. बालेकिल्ल्याची चढण चढताना जेवढी अवघड वाटते त्यापेक्षा ती उतरणे जास्त अवघड आहे.

बालेकिल्ल्याला खालील बाजुने प्रदक्षिणा घालता येत नाही. सुवेळा माची आणि संजिवनी माची या दोघांच्या मधे तिव्र उतार असलेली दरी आहे त्यामुळे संजिवनी माचीकडे जाण्यासाठी परत ढालकाठीच्या जागेकडे यावे लागते. एवढे फिरून होईपर्यंत सुर्य पश्चिमेकडे कललेला असतो. मग तोरण्याच्या मागे मावळणा-या सुर्याचे दर्शन घेतल्या नंतर त्यादिवसाची भटकंती तिथेच थांबवावी लागते. रात्रीचा मुक्काम हा पर्यटकनिवासात किंवा पद्मावतीदेवी मंदिरात किवा सरकारी कचेरीमधे तिथल्या सेवकाच्या परवानगीने करता येतो. गडावर काही ठराविक ठिकाणी तसेच गुंजवणे-चोर दरवाजा मार्गावर आणि पाली दरवाजा मार्गावर पायथ्यापासुन वरपर्यंत लांब-लांब अंतरावर सौर दिवे बसवलेले आहेत. रात्रीचे ट्रेकीग करताना त्याचा मार्गदर्शकाप्रमाणे उपयोग होतो.

पहाटेच्या गारव्याने सुर्योदयापुर्वीच जाग येते. लक्षात येते की सुर्योदय होण्यास आजुन बराच अवधी आहे, तोपर्यंत सकाळचे कार्यक्रम उरकून घेता येतात. पद्मावतीमाचीवरून अप्रतिम सुर्योदय पहायला मिळतो. संजिवनी माचीवर जाण्याची वाट बालेकिल्ल्याच्या उजव्याबाजुने गेलेली आहे. उजव्या बाजुला पाली दरवाजा मागे टाकून त्या रस्त्याने पुढे जाताना काही मधमाशांची पोळी दिसतात. आजून पुढे गेल्यास वरच्या बाजुला कड्यच्या भिंतीपासुन थोडा बाहेर निघालेला एक सुळका आपले ध्यान वेधुन घेतो. लवकरच आपण संजिवनी माचीच्या पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचतो. संजिवनी माचीचे तिन वेगळे भाग असल्याचे आपल्याला लक्षात येते. पहिला भाग हा थोडा जास्त रुंदीचा असून तेथे काही बांधकामचे अवशेष दिसतात. दुस-या टप्प्यावर माचीची तटबंदी ने केलेली संरक्षण रचना लक्षात येते. ह्या टप्प्यावर पाण्याच्या काही खोदीव टाक्या आहेत, काही टाक्यांमधे उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी टिकून असते पण वापरा अभावी ते पाणी पिण्यायोग्य नाही. तिसरा टप्पा पहिल्या दोन्हीपेक्षा रुंदीने कमी असला तरी दोन्हीपेक्षा दुप्पट लांब आहे. या टप्प्यावर उतरता क्षणी चिलखती तटबंदी ची वैसिष्टपुर्ण रचना नजरेस पडते. सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्यावर या पद्धतीचे थोडे बांधकाम आहे पण त्याचे वैसिष्ट तिथे लक्षात येत नाही. माचीच्या दोन्ही अंगाला तटबंदिचे दोन पदर असून दोन भिंतीच्या मधे साधारण्पणॆ दिड फुट अंतर आहे उंची ६ फुटा पासुन काही ठिकाणी १२ ते १५ फूट इतकी आहे. ह्या फटीतून एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत बिनदिक्कत पणे जाता येते फक्त आत कोणता प्राणी नाही ह्याची खात्री करून घ्यावी. ह्यातुन तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस उतरण्यासाठी केलेला दरवाजा दिसतो. माचीच्या शेवटच्या टोकाकडे जाऊन मागे वळुन पाहील्यावर गडाच्या उत्कृष्ट , भव्या, आणि सुबक बांधकामाची कल्पना येते. यासारखे शिवकालीन बांधकाम अन्यत्र पहावयास मिळणार नाही. वरून खाली पाहीले असता दुरदूरवर पसरलेल्या संह्याद्रीच्या रांगा, नद्या निरेचा जलाशय आणि अभेद्य तोरणा आपल्याला खुणावत असतो. गडाच्या घे-याचे निट निरिक्षण केल्यास मधेच काही उंचीवर ८-१० घरांची वस्ती दिसते, त्याचे अस्तित्व शिवपुर्वकालापासुनचे आहे. गडाच्या संरक्षणाची एक योजनाच आहे ती, गडाच्या गस्तीची जबाबदारी ह्या घेरेक-यांची. शत्रूचा हल्ला झालाच तरी त्याला तात्पुरते थोपोवणे आणि हल्ल्याची सुचना गडाला देण्याचे काम ह्या लोकांवर सोपवलेले आहे. इथे पोहोचेपर्यंत २-३ तास निघुन गेलेले असतात. मग पद्मावतीमाचीवर पोहोचल्यावर जेवणाची सोय करायची आणि पद्मावती तलावाच्या पाण्याने थोडे ताजेतवाने होऊन गड उतरण्यास सुरवात केल्यास दुपारी ३ पर्यंत गुंजवणॆ गावात पोहोचता येईल. मग लगेच ४ च्या एस. टी. ने पुणे गाठता येऊ शकते.

राजगडाचा प्रत्तेक ट्रेक हा पुर्विपेक्षा वेगळा अनुभव देणारा असतो. प्रत्तेक ऋतू मधे त्याचे वेगळेपण दिसते. उन्हाळ्यात गेलात तर गडाच्या कानाकोप-यात घुसता येते. रात्रीचा मुक्काम किंवा रात्रीचा ट्रेक हे ऊन्हाळ्यात करण्यात वेगळीच मजा आहे जे इथल्या धुव्वाधार पावसात किंवा कडाक्याच्या थंडीत शक्य होत नाही. पावसाळ्यात केवळ अपेक्षा धुव्वाधार पावसाचीच, डॊंगर उतारावरून फेसाळत उतरणारे झरे आणि ढगांनी भरून गेलेला आसमंत. काहीवेळा अचानक ढग बाजूला सरकून त्या झरोक्यातून दिसणारे दृश्या अप्रतीम. पावसाळ्यात इथे यावे ते केवळ ह्यासाठीच. हिवाळ्याचा सुरवातीचा काळात राजगड म्हणजे अगणित रानफुलांनी नटालेला स्वर्गच. हिवाळ्यात शेकोटी वगैरे करून एखाद दिवस थंडीने कुडकूडत मुक्काम करता येऊ शकतो, मात्र दिवसा उशीरापर्यंत दाटून राहिलेले धुके आणि लवकर पडणारा आंधार आणि गोठवणारी थंडी ह्यामुळे हिवाळ्यातला मुक्काम सुखावह होत नाही. सध्या सुट्टीच्या दिवशी गेलात तर जेवणाची सोय होऊ शकते, तसेच ताक आणि लिंबुसरबत विकणारी गावातली पोर सुद्धा गडावर असतात.

आता परत राजगडावर जायचे आहे, पावसाळ्यात. वर्षाविहाराला.

Saturday, May 08, 2010