Monday, January 21, 2008

किल्ले कोरीगड







बरेच दिवस ट्रेक झाला नव्हता आणी तितकासा वेळही देता येत नव्हता. ह्या रविवारी लहानसाच फारशी दमछाक न होता करता येण्यासारखा बाईक रायडींग आणी ट्रेक करायचा, पण जायचे कोठे ? लोणावळ्या पासुन जवळ असलेल्या कोरीगडावर जायचे ठरले. शनिवारी मी जेव्हा माझा मावस भाऊ सुशांत ह्याला फोन केला तेव्हा तोही लगेच तयार झाला, रात्री त्याच्या घरी त्याला आठवण करायला गेलो तेव्हा विनोद आणी निखिल सुद्धा आमच्या बरोबर येण्याची तयारी करत होते. फार लांब जायचे नसल्याने रविवारी सकाळी आठ साडे आठ ला शनिवार पेठेत भेटण्याचे ठरले.

सकाळी तिथेच सुशांतच्या घरी पोटभर नाष्टा केला. विनोदला मात्र येण्यासाठी थोडा उशिरच झाला. निघता निघता १०.३० वाजुन गेले. जुन्या मुंबई पुणे हमरस्यावरुन २ तासात लोणावळा गाठले. बरोबर खायचे काहीच घेतले नसल्यामुळे लोणावळ्यातच अल्पोपहार करायचे ठरवले. तिथे एका उडपी लंच होम मधे सांबार घातलेली मिसळ खाल्ली.

कोरी गडाकडे जाण्यासाठी लोणावळ्याहुन सिद्धेश्वर मंदिर, भुशी धरण, आय. एन. एस. शिवाजी वरुन पुढे पेठ शहापुर च्या दिशेने एका अवघड वळणाच्या घाट मार्गे जावे लागते. जाताना एका ठिकाणी थांबुन मावळ खो-याचे विहंगम द्रुश्य पहात बसलो. तिथे शंकराच्या पिंडी च्या आकाराप्रमाणे दिसणारी एक डोंगररांग दिसते. तासाभरातच पेठ शहापुर ह्या किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावात पोहोचलो. लोणावळा ते पेठ शहापुर अंतर साधारणपणॆ २२ किमी चे आहे. गावात जाउन गडावर जाणा-या मार्गाबद्दल विचारल्यावर त्याने आम्हाला परत फाट्यावरुन तिकडन तिकडुन तिकडे जाव असे सांगितले. आम्ही त्याचा अर्थ फाट्यावरुन आजुन थोडे पुढे जाउन तिकडुन रस्ता आहे असा करुन घेतला आणी थेट तसेच सहारा प्रोजेक्ट च्या थेट मेन गेट पर्यंत गेलो. त्यांनी आम्हाला तितक्याच तत्परतेने शहापुर फाट्यापासुनच एक पायवाट असुन तेथुन वर जाता येइल अशी माहिती पुरवली परत मागे येउन पाहीले तेव्ह त्या तिकडुन तिकडचा अर्थ समजला.

एका अडोश्याच्या ठिकाणी वहाने लाउन पाउल वाट धरली थोडे पुढे गेल्यावर एका दगडावर दिशा दर्शक बाणाची खुण अढळली. कोणत्या तरी दुर्ग प्रेमींनी अनेक परिचीत अपरिचीत किल्ल्यांवर अश्या मार्गदर्शक खुणा केल्या आहेत. त्यावरुन मार्गक्रमण करत दाट झाडीतुन गडाच्या मागील अंगाला येउन पोहोचलो आजुन थोडे पुढे गेल्यावर अचानक पाउलवाट संपते. आणो गड चढण्यासाठी पाय-या चा मार्ग लागतो. पहील्या ७०-८० पाय-या वर चढुन गेल्यावर एका कोरिव गुहेपाशी पोहोचतो. गुहेमधे एका बाजुला पाणी साठा आणे त्याच्या मागच्या बाजुला १५ ते २० लोक आरामात झोपू शकतील एवढी जागा आहे. बाजुलाच श्री गणॆशाचे मंदिर असुन गणॆशाची सुबक मुर्ती तेथे आहे.

आजुन थोडे वर चढुन गेल्यावर वाटेच्या दोन्ही बाजुला थोड्या आत मधे दोन लहान गुहा दिसतात एका गुहेमधे पाण्याची छोटी टाकी असुन त्यातले पाणी पिण्यालायक आहे. दुस-यागुहेमधे एक कट्टा बांधलेला दिसतो त्यावरुन ती एकाद्या चौकीदाराची खोली असावी. आजुन थोडे वर चढुन गेल्यावर गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. इतर किल्ल्यांप्रमाणॆ ह्या ही किल्ल्याचे द्वार थेट तोफेच्या मारा पासुन सुरक्षित राहील अश्या पद्धतीने बांधलेले आहे. गडाचा परीसर बराचसा सपाट असुन तिन ते पाच फुट उंचीची आणी तितक्याच रुंदीची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. गडाच्या पठारावरील जमिनीवर तण माजले असुन ते वाळल्यामुळे सोनेरी गालीचा पसरल्या प्रमाणे वाटत होता. तटबंदीवरुन दिसणारी सहारा सिटी पहात गडप्रदक्षिणा सुरु केली. गड तसा लहानसाच असला तरी गडावर येण्यासाठी आजुन एक दरवाजा आहे. आणि कमी उंचीचा असल्यामुळे बुरुज आणी भक्कम तटबंदी बांधुन काढलेली आहे. गडावर एका पडक्या वाड्याचे अवशेष, पाच सात तोफा आणी पाण्याची दोन मोठी तळी असुन मुबलक पाणी साठा आहे.

गडाचे दैवत म्हणजेच कोरलाई मातेचे मंदिर गडावर असुन मुर्ती प्रसन्न आहे. गो.नी दांडेकरांच्या पुस्तकावरुन मिळालेल्या माहिती नुसार, १८१८ पर्यत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता तो पर्यंत देविच्या पुजाअर्चेची उत्तम व्यवस्था होती, तर देवीला दागिनेही होते. १८१८ मधे किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर ते दागिने त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबादेवीला देण्यात आले. सध्या मंदिराचे छप्पर उध्वस्त झाले आहे. गडावर आजुन काही मंदिरे असुन चांगल्या स्थितीत आहे. मात्र ही मंदिरे सोडली तर गडावर सावली साठी एकही झाड सापडायचे नाही. तर कोणितरी गडावरील अर्धा सोनेरी गालीचाही जाळून नष्ट केल्याचे दिसत होते.

थोडावेळ तसेच एका बुरुजावर तापत्या उन्हात थांबुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गणपती मंदिरापाशी मुंबई हुन आलेला गिरी संचार चा ग्रुप विश्रांती घेत पडला होता. त्यांची झोपमोड करुन त्याची कोठुन आला वगैरे चौकशी केली जरा वेळ तिथेच बसुन आम्हीही आराम केला. दुपारचे साडेचार वाजुन गेले होते. भुक लागली होती आणी खालच्या गावात ह्यावेळेस आम्हाला काही खायला मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळे लोणावळ्याला जाउन जेवणाचा बेत ठरवला. पाच वाजेपर्यंत पेठ शहापुर फाट्यावर येउन पोहोचलो. तिथल्या हातपंपावरुन पाणी उपसुन थोडे ताजे तवाने झालो आणी पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.