दिवाळीला मिळणा-या सलग सुट्टीचा फायदा घेत थोड्या लांबच्या अंतरावरील किल्ल्यांना भेट देण्याची योजना आखली होती. २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर ला फोलिएज ह्या संस्थेने रणथंम्भोर च्या राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचे आयोजन केले होते. रणथंम्भोर हे खास वाघांसाठी संरक्षीत करण्यात आलेले उद्यान आहे. आजून दोन दिवसांची सुट्टी काढून आम्ही राजस्थानातील तेथुन जवळ असलेल्या चितौडगड, आणी उदयपुर ह्या ठिकाणी जाण्याची योजना आखली.
२५ ला पुणे ते मुंबई / बान्द्रा आणी तेथुन बान्द्रा-जयपुर एक्सप्रेस ने २६ तारखेला सवाई माधवपुर ह्या रणथंम्भोर पासून जवळाच्या स्थानाकावर निर्धारीत वेळेपेक्षा फक्त एक तास उशीराने पोहोचलो. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गाडीला मात्र प्रचंड गर्दी होती. ह्या रणथंम्भोर जंगलसफारीचे संपुर्ण मार्गदर्शन राहुल राव (फोलिएज चा सदस्य)हा त्याच्या दोन सहका-यांच्या मदतीने करणार होता. जंगल सफारीसाठी येथे छत नसलेला २०-२५ लोक आरमात बसू शकतील असा लष्करी पद्धतीचा ट्रक ( कँटर ) उपलब्ध आहे, तसेच केवळ ५-६ लोक बसतील अश्या मारूती जिप्सीने सुद्धा जंगलात जाता येते. सवाई माधवपुर पासून ४ किमी अंतरावरील साध्या पण चांगल्या अश्या हमीर नावाच्या हॉटेल मधे आमची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेल ला पोहोचलो तोपर्यंत १०.३०-११ वाजले होते. राहुलने दुपारी दोन वाजता तयार राहाण्यास सांगीतले. आज रणथंम्भोर च्या किल्ल्यावर जायचे होते.
तिथे डॉ. धर्मेद्रजी ह्यांचा परिचय राहुलने करून दिला. धर्मेद्रजी हे त्या भागातील एक सामाजीक कार्यकर्ते, जंगलाचे संरक्षण, जंगलामुळे त्यावर अवलंबुन असणा-या समाजाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. धर्मेंद्रजीनी दिलेल्या माहीतीनुसार १९९६ च्या सुमारास जंगलाच्या आतमधे तब्बल २० गावे होती. त्यांची जनावरे तिथेच चरत, तसेच जंगलाच्या भोवताली मोंगया समाजाची वस्ती होती, वन्या प्राण्यांची शिकार करणे त्यांची विक्री करून त्यापासून मिळणा-या उत्पन्नावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नंतरच्या काळात वाघांची बेसूमार शिकार झाली त्याचे कारण म्हणजे चिन च्या बाजारपेठे मधे भारतीय वाघांना असलेली प्रचंड मागणी आणी त्याप्रमाणे मिळणारी किंमत, चिन मधे वाघांचा प्रत्तेक अवयवाचा उपयोग वेगवेगळी औषधे बनवण्यासाठी केला जातो. तेथील निवृत्त वन अधिकारी फतेसिंहजी ह्यांच्या मदतीने धर्मेद्रजींनी अनेक शिकारी पकडल्या आहेत. च-या साठि होणारी घुसखोरी रोखण्याच्या प्रयत्नात धर्मेंद्रजीना गंभीररीत्या मारहाण करण्यात आली होती. जंगलातील २० पैकी आत्ता पर्यंत १६ गावांचे जंगलाच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे. मोंगया शिकारी समाजाच्या पुनर्वसना साठी धर्मेदजीचे मोठे योगदान आहे.
आरवली पर्वत रांगेमधील आणी घनदाट जंगलाच्या मध्यभागी हा किल्ला आहे. एका खिंडीमधे बांधलेला दरवाजा पार करुन मुख्य जंगल भागात येऊन पोहोचलो, त्याच बरोबर राहुलने तिथे दिसलेले पक्षी, प्राणी ह्यांची माहीती देणास सुरवात केली होती. किल्ल्यापासुन चारी दिशांनी उंच अश्या डोंगररांगांची नैसर्गीक तटबंदी आणी मधल्या मोकळ्या रांगेत बिबट्या, वाघ, अस्वले, मगरी आदी हिंस्त्र श्वापदांनी युक्त असे जंगल आहे. किल्ल्याची उंची तशी फरशी नाही पण किल्ल्याला चारी बाजुने बांधून काढलेली तटबंदी, अनेक बुरुज बांधून हा किल्ला अधिक संरक्षीत करण्यात आला आहे. कोण ह्या किल्ल्याच्या वाटेला जाईल अशी शंका नक्की आपल्या मनात येतेच. पण किल्ल्याचा इतिहासात डोकावून पाहील्यास ह्या किल्ल्यासाठी अनेक लढाया झाल्याचे दिसते. किल्ल्यातील फलाकावर लावलेल्या माहीतीनुसार ११९२ मधे चौहानांच्या ताब्यात आला, १२८२ मधे हमीर नावचा चौहान वंशीय राजा इथे राज्य करीत होता. तर १२९० मधे जलालुद्दीन खिलजी ने तिन वेळा हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला. १३०१ मधे अल्लाउद्दीन खिलजी ने स्वतः १ वर्ष किल्ल्याला वेढा देऊन हा किल्ला जिंकुन घेतला आणी किल्ल्याची मोठ्या प्रमाणात तोड-फोड केली. त्यानंतर १६ व्या शतकात हा किल्ला मालवा च्या राणा सांगा च्या ताब्यात होता. त्यानंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला आणी त्यानंतर परत १७ व्या शतकाच्या शेवट हा किल्ला जयपुर नरेषांच्या ताब्यात आला. १७ व्या शतकानंतर तसेच इंग्रज शासनकाळात ह्या किल्ल्याचा वापर शिकारी करण्यासाठी छावणी म्हणुन झाला. किल्ल्यावर अनेक हिंदु / जैन मंदिरे, एक मशिद आणी एक दर्गा आहे, पाण्याची तळी आणी विहिरी आहेत. अनेक महालांचे अवशेष आजून तग धरुन आहेत. तटबंदीत एका मागे एक असलेले नौलखा दरवाजा, हाथी दरवाजा, गणेश दरवाजा असे भव्य आणी भक्कम चिलखती दरवाजे पार करताना किल्ल्याच्या भव्यतेची कल्पना येते. किल्ल्याच्या वरील भागात सुद्धा वन्य जीवांचा मुक्त संचार आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारा जंगल परीसर बराच वेळ निरखत बसलो. किल्ल्याच्या पायथ्याशी भले मोठे राजबाग नावाचे तळे आहे, त्यासभोवतालच्या कुरणांचे निट निरीक्षण केल्यावर तेथे काही हरणे चरताना दिसली. संध्याकाळ होत आलेली पाहून तिथूनच परत फिरलो.
हॉटेल वर पोहोचल्यावर सगळ्या मंडळीची बैठक भरवण्यात आली. उद्यापासुन आमची जंगलसफारी चालू होणार होती. आयत्यावेळेस तिथे जाऊन सफारीचे बुकिंग मिळणे अशक्य असते, तसेच त्या बरोबर प्रत्तेकाला आपली वैयक्तीक माहिती विहीत नमुन्यात जितक्या वेळा सफारीला जायचे तितक्या प्रतींमध्ये भरून द्यावी लागते. राहुलने भडक रंगाचे कपडे वापरू नका, कोणत्याही प्रकारचे सुगंधी द्रव्य आंगाला / कपड्याला लावू नका, आणी महत्वाचे म्हणजे सकाळी ६ वाजता निघण्यासाठी तयार रहाण्यास सांगितले. त्याच बरोबर त्याने ह्या जंगलाची माहीती सांगितली. जंगलाचे मुख्यत्वे दोन भाग असतात एक म्हणजे त्याचा गाभा ( कोअर एरिया) आणी बाहेरील भाग ( बफर एरिया) रणथंम्भोर च्या गाभ्याचा विस्तारच सुमारे ४०० चौ कि.मी चा आहे. त्या भागातील केवळ २५% भाग हा पर्यटकांसाठी खुला असुन तो पहाण्यासाठी सुद्धा तिन दिवस कमी पडतात. २००४ मधे वाघांची संख्या ही केवळ १३ वर आली होती पण सध्या ती २५-३० च्या दरम्यान असावी असे सांगितले जाते. राहुल ला राना-वनांचे प्रचंड आकर्षण आहे, हे जंगल तर त्याला पाठ झाले आहे. वन खात्याच्या टायगर मॉनिटरींग प्रकल्पात त्याने भाग घेतला होता. त्यात त्याला जंगलचा तसेच वाघाच्या जीवनाचा अतिशय जवळून आभ्यास करता आला. जेव्हा बाहेरचे गवताचे रान कमी होऊ लागते तेव्हा जंगलाच्या बाहेरील गावतले धनगर / मेंढपाळ त्यांची जनावरे चा-यासाठी जंगलात घुसवतात. त्यांना रोखण्यासाठी जंगलाच्या सिमा भागात अधिक प्रमाणात बंदोबस्त ठेवावा लागतो तेव्हा जंगलाच्या आतल्या भागात काम करणारे कर्मचारीच हे काम करतात आणी त्यांच्या जागेवर जंगलाची आवड असणा-या कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी देण्यात येते, दोन कार्यकर्ते आणी एक वनखात्याचा कर्मचारी मिळून १५-१५ दिवस हे काम करतात. राहुलने उद्या आजुन लवकर उठायचे आहे अशी सुचना केली, त्यामुळे जेवण करून लगेच झोपी गेलो.
दुस-या दिवशी पहाटे ५.३० ला राहुलच्या जोडीदाराने आमची झोपमोड केली, त्याच्यावरच ही खास जबाबदारी सोपवण्यात आली होती. ६.३० ला कँटर आला आणी वाघाच्या शोधात आमची जंगलसफारी सुरु झाली. पर्यटकांची एका जागी गर्दी होऊ नये म्हणुन जंगलाचे ५ विभाग करण्यात आले आहे. सफारीच्या त्यावेळेस ठरलेल्या वेळेत ठरलेल्या विभागातच त्या त्या वहानाने प्रवास केला पाहीजे. तसेच ह्या जंगलात प्रवेशाची आणी बाहेर पडण्याची वेळ काटेकोर पणे पाळली जाते. संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना आत प्रवेश मिळत नाही तसेच तीथे थांबताही येत नाही. आज सकाळी आम्हाला झोन क्र. १ मधे जाण्याची परवानगी दिली होती. आतल्या प्रवेशद्वारावर रोजच ट्रिपाय नावाचा देखणा पक्षी आमचे स्वागत करायचा. चढ उतार तर काही ठिकाणी तिव्र वळणे असलेला आणी एका वेळेस एकच कँटर जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा कच्चा रस्ता आहे. मधे मोकळ्या कुरणांमधे काही हरणं आणी सांबर चरताना दिसले. थोडे पुढे गेल्यावर डोंगरावरील भागातून वानराने दिलेला हकारा ऐकू आला. गाडी जागेवर बंद केली आणी सगळे जण त्या दिशेने पाहू लागले. परत एक दोन वेळा तसाच इशारा मिळाला ह्या वेळेस सांबरानेही इशारा ( कॉल ) दिला होता, पण वाघोबा काही समोर यायला तयार नव्हते. राहुल तो पर्यंत सतत दिसणा-या वेगवेगळ्या पक्ष्यां बद्दल सतत माहीती पुरवत होताच. जंगलाच्या हया भागात अस्वले दिसू शकतात. तासभर तिथेच रेंगाळलो आणी मागे फिरलो. हॉटेलवर जेवण करून परत एकदा जंगलात शिरलो दुपारच्या फेरीसाटी झोन ५ मधे गेलो. हा रस्ता जंगलातील राजबाग तलावाच्या बाजूने गेलेला आहे. ह्या तलावामधे मगरींचा वावर आहे. काही मगरी, एक मोठ्या आकाराचे कासव दिसले. तर विविध प्रकारचे पाण पक्षी पहायला मिळाले. त्या फेरीमधे सुद्धा वाघ काही दिसला नाही. उलट ५ मिनिटे बाहेर पडण्यास उशीर झाल्याने वन अधिका-यांची बोलणी खावी लागली. पण जंगलाचे जे काही दर्शन घडले ते सुद्धा काही थोडके नव्हते.
नंतरच्या दिवशी सकाळी ५ वाजता झोपमोड करण्यात आली होती, पटापट आवरून कँटर मधे जाऊन बसलो. मुख्य प्रवेशद्वार पार केले, पुढचे द्वार मात्र आजुन बंदच होते काही मिनिटातच तेही उघडले. पहिली आमचीच गाडी त्या विभागात शिरणार होती. आज झोन क्र. ४ मधे फिरण्याची परवानगी मिळाली होती. थोडे आत गेल्यावरच इशारतीचा आवाज झाला. तिथे थांबुन थोडा अंदाज घेतला आणी आजून थोडे पुढे गेल्यावर चालकाने गाडी थांबवली. खाली मातीमधे वाघाच्या पावलांचे उमटलेले ठसे त्याने दाखवले आणि ते काही वेळांपुर्वीचेच असावेत असे त्याने सांगितले. पुढे अनेक ठिकाणी वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. ह्या झोन मधे एका तलावाच्या बाजुला एक चौकी आहे, फक्त तिथेच तुम्हाला कँटर मधून खाली उतरण्याची परवानगी आहे. त्या तलावाचे पाणी एकदम स्तब्ध होते. तळ्याचे त्यातील प्रतिबिंबांचे काही फोटो काढले व परत पुढचा प्रवास सुरू केला. काही अंतर गेलो असेल तोच चालकान गाडी बंद केली. गाडीच्या मार्गातच एक वाघीण बसली होती. तिच्या मागील बाजूने आजून एक गाडी आल्याने ती वाघीण तेथून उठली आणी आमच्या दिशेने चालत येऊन झाडीमधे घुसली. झाडामधे त्या वाघीणीचे दोन बछडे सुद्धा दिसले, बघताना ते बछडे आहेत असे कधीही वाटले नसते. वन अधिका-ने सांगितले की त्यांचे वय केवळ दिड वर्षाचे आहे. वाघीण साधारण पणे दोन वर्षापर्यंत त्यांचा संभाळ करते. इथे जंगलात प्रत्तेक वाघाचे स्वतंत्र साम्राज्य असते, त्याचा विस्तार १५ ते ३० चौ. किमी. इतका किंवा त्यापेक्षाही अधीक असू शकतो. वाघाचे ते रुप डोळ्यात साठवून घेत हॉटेलवर परतलो. राहुलने फतेसिंगजी ह्याच्याबरोबर एका बैठकीचे आयोजन केले होते. फतेसिंगजी हे निवृत्त शासकिय वन अधिकारी. निवृत्ती नंतरही जंगलाशी असणारे त्यांचे नाते जरा देखील कमी झाले नव्हते. ब्रिटिशांच्या काळात इंग्लंडच्या राणीला जेव्ह्या शिकार करायची होती तेव्ह्या फतेसिंहजी तेथे व्यवस्था पहायला होते. राजे लोकंची शिकारीची पद्धत त्यांनी सांगितली. जंगलात रुजू झाल्यावर त्यांचा सामना ज्या वाघिणी बरोबर झाला त्या पद्मिनीची त्यांनी आठवण सांगितली, तिच्या नावावरून त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव पद्मिनी ठेवले. त्यांचावर गुदरलेला भयानक प्रसंग कोणता असा प्रश्न विचारला असता त्यानी सांगितले की हे जो काही मी दिसतो आहे हा माझा पुनर्जन्मच म्हणावा लागेल. जंगलात घुसखोरी करणा-या शेतक-यांना जेंव्हा फतेसिंहजीनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जीव जाई पर्यंत मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत जंगलामधे फेकून दिले, पण त्यातुनही ते अश्चर्यकारक्रीत्या वाचले. ज्यावेळेस जंगलातील गावं हलवण्याचे काम फतेसिंहजी ह्यांनी केले, पण स्थालांतरीत करण्यात आलेल्या प्रत्तेक कुटूंबाचे पुनर्वसन योग्य पद्धतिने केले जाते आहे ह्या कडे त्यांनी स्वतः लक्ष दिले होते. जंगलात फिरण्यासाठी जो कच्च्या स्वरुपाचा रस्ता तयार केला त्याचा विस्तार सुमारे १२५ किमी असून त्याचीही संपूर्ण रचनेमधे पत्तेसिंहजीचा मोठा सहभाग आहे. त्याचबरोबर वाघांच्या संरक्षण पुनर्वसन ह्यामधे त्यांचा मोठा हात आहे. जंगलाच्या होत चाललेल्या पर्यटन स्थळ ह्या प्रकाराबद्दल त्यांचा मनात प्रचंड चिड आहे. त्यांचा निरोप घेउन हॉटेलवर परतलो. दुपारी सुद्धा असेच लवकर जायचे आहे त्यामुळे २.३० ला सगळ्यांना तयार रहाण्याचा आदेश राहुलने दिला.
दुपारी झोन क्र.३ मधे जायची परवानगी मिळाली होती. आतले फाटाक उघडण्यपुवीच आम्ही तिथे दाखल झालो. थोडे पुढे गेलो तोच समोरून एक वाघीण आमच्या दिशेने चालत येताना दिसली. आमच्या पुढे एक जिप्सी होती तीच्या पासून केवळ तिन फुट अंतरावरून ती झाडीत घुसली, आणी रस्त्याला समांतर चालु लागली. चालकाने जलदपणे आमची गाडी मागे घेतली आणी त्यामुळे आम्हाला बराच वेळ निरीक्षण करायची संधी मिळाली. ती वाघीण बेफिकिर पण चालत होती, काही अंतरावरून कॉल देणारे सांबार, झाडावरून विसिष्ठ आवाजात ओरडणारी माकडे याकडे पुर्ण दुर्लक्ष करत ती चालत होती. ह्या वाघीणीच्या गळ्यामधे रेडिओ ट्रान्समिटर चा पट्टा अडकवला होता, आणी तिला पकडून लवकरच दुसरीकडच्या जंगलात स्थानांतरित करणार होते. ह्या वेळेस चिंकारा जातीचे हरीण पहायला मिळाले तर न चमकणा-या शिल्लक राहिलेल्या काळ्या पिसांचा फुलोरा करुन नाचत असलेला मोर दिसला. घुबडाच्या काही प्रजाती पहायला मिळाल्या. हरणांचे एकदम जवळून निरीक्षण केले असता त्यांच्या शिंगांवर वाढलेली लव स्पष्टपणे दिसून आली. संध्याकाळी हॉटेलवर परतल्यावर रणथंम्भोर च्या जंगलात चित्रीत करण्यात आलेले दोन माहितीपट दाखवण्यात आले. एक वाघाच्या दैनदिन जीवनावर आधारीत होता तर दुसरा डॉ. धर्मेद्रजीनी जंगल व्यवस्थापन आणी सरकारी कामकाज ह्यावर तयार करण्यात आला होता.
लक्ष्मीपुजना निमित्त हॉटेल मधे राजस्थानी नाचगाण्यांचा कार्यक्रमाचे ठेवला होता. उद्या रणथंम्भोर मधला आमचा शेवटचा दिवस होता. सकाळी निसर्गात जंगलाच्या बाजुने पदभ्रमण व पक्षी निरिक्षणाचा कार्यक्रम होता. तसेच थोडे उशिराने म्हणजे ६ वाजता झोपमोड केली जाईल असे राहुलने सांगितले.
हॉटेलच्या समोरच्या बाजुस फतेसिहजी ह्यांच्य घराच्या मागील बाजुस आम्ही गेलो होतो. तिथे आम्हाला मातीत बिबट्याचे ठसे आढळले. मनुष्यवस्तीच्या इतक्या जवळ एखादे श्वापद नेहमी येउन जाते हा विचारच आमच्या सारख्या शहरी मनाला न पटणारा होता. पांढरा / काळ्या रंगाचा कोतवाल, वेडा राघु, असे वेगवेगळे पक्षी राहुल दाखवत होता आणी आम्ही त्यांचे फोटो काढण्याचा आणी त्यांची नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. एका बांबुच्या झाडावर बसलेला एक साप दिसला हा ब्रॉंझ बॅक स्नेक होता. तो बिनविषारी आहे असे सांगुन राहुलने त्याला झाडावरून काढून हातात घेतले. पुढे हॉटेलवर जरा घाईनेच परतलो. गोविंद, आरती, मी आणी आजुन तिघे जण तर इथे आमचा मित्र झालेला अनिरुद्ध असे एकुण सात जण मिळुन चितौडगड ला जाणार होतो. तर बाकिचे १२ लोक दुपारच्या गाडिने लगेच परतीचा प्रवास सुरु करणार होते.
सगळ्यांचा निरोप घेउन हॉटेल सोडले जाताना एके ठिकाणी थांबुन मोंगया जमातीच्या लोकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या दुकानात जाउन खरेदी केली. चितौड ला जाण्यासाठी थेट गाडी सकाळी आहे, तर अंतर साधारणपणे २०० कि.मी. च्या आसपास असेल. सकाळची गाडी पकडणे शक्य नसल्यामुळे दुपारी कोट्याला रेल्वेने व पुढे दुस-या पर्यायी व्यवस्थेचा शोध घेउन पुढचा प्रवास करायचा होता. तसेच इथून पुढच्या प्रवासाची जबाबदारी पुर्णतः आमच्यावर होती, तर उदयपुर-पुणे प्रवासाचे तिकीट व उदयपुर इथले हॉटेलचे बुकिंग फोलिएज मार्फत केले होते. सवाई माधवपुर दुपारी १२.३० ला सोडले अवध एक्सप्रेस ने दुपारी २ पर्यंत कोटा गाठले. तिथे एका रिक्षावाल्याच्या मदतीने ट्रॅक्स गाडी ठरवून घेतली, त्याने आमच्याकडुन परतीच्या भाड्यासहीत २७००/- इतके भाडे आकारले. मिळालेली गाडी इतकी सजवलेली होती की तिचा फोटो काढल्याशिवाय मला रहावलेच नाही. इथे बहुतांश गाड्या अश्याच आहेत. रा.म. क्र. ७९ वरून आम्ही प्रवास सुरुवात केला. इथले रस्त्यावर त्यामानाने वर्दळ आगदीच तुरळक होती ३-४ कि.मी. अंतर पार केल्यावर दुसरे एखादे वहान दिसायचे. ह्या वहातुकीसाठी जर इथे चौपदरी रस्ते आहेत तर आपल्या पुणे मुंबई रस्त्यावरिल वहातुक पाहील्यास तो कमीत कमी आठ पदरी असायला हवा. रस्त्याच्या बाजुने भले मोठे माती राडा-रोडयाचे ढिग दिसले, सुरवातिला ते हा महामार्ग तयार करताना झालेल्या खोदकामाचा प्रताप आहे असे वाटले. पण आजु-बाजुच्या प्रदेशात असे प्रचंड मोठे डोंगर दिसले मग कळले की आपण वापरतो त्या कोटा दगडाच्या खाणींचा हा भाग आहे, आणी त्यात निर्माण झालेला हा दगडाचा निरुपयोगी भाग आहे. जाताना मेनाल (मेहनाल) ह्या ठिकाणी असलेल्या भगवान शंकराचे एक पुरातन मंदिर पहाण्यासाठी थांबलो. खजुराहो येथील मंदिराच्या प्रमाणे हे मंदिर बांधलेले आहे, तर बाजुला पावसाळ्यात वहाणारा प्रचंड धबधबा आहे. इथे सुर्यास्त पाहून पुढचा प्रवास सुरु केला. जेवणाचे आज तसे हालच झाले होते. सकाळी केलेली न्याहारी आणी दुपारचा फळांचा रस इतक्यावरच होतो. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास चितौड मधे पोहोचलो. लखलखीत प्रकाशझोतात उजळुन गेलेल्या किल्ल्याचे दर्शन घडले. चितौड शहर तर दिवाळीच्यनिमित्त केलेल्या रोषणाईमुळे झगमगत होते. जिकडे तिकडे लाईटच्या माळा, आणी विशेष म्हणजे हे सर्व तिथल्या नगरपालिकेने केलेले होते. तिथे पद्मिनी पॅलेस नावाच्या एका आलीशान हॉटेल मधे आमची राहाण्याची व्यवस्था झाली होती. हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या मदतीने दुस-या दिवशी किल्ल्यावर जायची सोय केली.
आज आमची झोपमोड करायला कोणी नव्हते, तरीपण सकाळी लवकर ७ वाजता उठलो. आठ वाजता किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रिक्षा बोलवल्या होत्या. सकाळची न्याहारी वगैरे उरकून किल्ल्याच्या दिशेने निघालो. गडाच्या पायथ्यापासूनच भक्कम असे दरवाजे आणी तटबंदी ह्यांच्या मधून वरपर्यंत रस्ता गेला आहे. गडाला एकूण सात मुख्य दरवाजे आहेत. आमचा रिक्षा चालक हा स्वतः अतिशय माहितीगार गाईडचे काम करणारा माणूस होता. तोच सगळ्या किल्ल्यावरुन आम्हाला फिरवणार होता. किल्ल्याच्या वर ४०० कुटूंब सध्या रहात आहेत व एक शाळाही आहे. किल्ल्यावर पर्यटकांना दाखवली जाणारी ठिकाणे म्हणजे, राज दरबाराची जागा, मिरा माहाल, दासी पन्ना जिथे रहायची ते ठिकाण, मिरा मंदिर, विजय स्थंभ, समाधी मंदिर (ज्या ठिकाणी सुमारे १३००० रजपूत स्त्रियांनी जौहर केला ते ठिकाण ) , तटबंदीचा बांध म्हणुन वापर केलेला एक तलाव, काली-माता मंदिर, तलावाच्या मधे बांधलेला पद्मिनी महाल, हाथी तलाव, सुरज पोल ( दरवाजा ), किर्ती स्थंभ आणी जैन मंदिर, हे सगळे दाखवताना गाईड त्या त्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती देत होता. किल्ला पहायला आम्हाला ५ तासही कमी पडले. आज रात्रीचा मुक्काम उदयपुर ला करायचा होता. मुक्कामाची सोय झाली होती. चितौडगड ते उदयपुर ह्या ११८ किमी अंतरासाठी तवेरा गाडी त्या रिक्षचालकाच्या ओळखीने मिळाली, गाडीवाल्याने २१०० रु आकारले. जाताना वाटेत चालकाने स्वत:हून एका नविन बांधकाम चालू असलेल्या श्री सावलिया सेठ (श्रीकृष्णाच्या) मंदिरात आम्हाला घेऊन गेला. मंदिर अतिशय सुरेख होते. संध्याकाळी ७-८ च्या सुमारास उदयपुर ला पोहोचलो. उदयपुर येथे कलिका नावाच्या हॉटेल मधे आमचा मुक्काम होता. गोविंदने उद्याच्या भटकंतीची योजना सांगितली आणी त्याला एकमताने मंजुरीही मिळवली. ज्या गाडीवानाने इथे सोडले त्यालाच आमचा उद्याचा कार्यक्रम सांगितल्यावर तो लगेच तयार झाला. सकाळी ८.३० ला निघायची वेळ ठरली. हॉटेल मधे काही खोल्याच फक्त रहाण्यासाठी योग्य असल्याचे लक्षात आले तसेच तिथल्या रेस्टॉरंट एकदम ढिले होते.
सकाळी न्याहारी करून प्रवासाला सुरुवात केली व कोणत्या कोणत्या ठिकाणी जायचे आहे ह्याची चालकाला यादी दिली. पहिल्यांदा उदयपुर पासुन जवळच असलेले नगदा गावाजवळचे श्री सहस्त्रबाहू चे जैन मंदिर आहे तिथे गेलो. मंदिराच्या नावाचा इथे अपभ्रंश झाला असून सध्या हे मंदिर सास-बहु नावाने ओळखले जाते. त्या नंतर पुढे एकलिंगजी भगवान शंकराचे मंदिर आहे. रजपुत राजाचे हे कुलदैवत त्यालाच हे लोक राजा म्हणतात म्हणुन स्वतःच्या नावाच्या मागे राजा ऐवजी राणा म्हणुन संबोधन केला जातो. देवळात प्रचंड गर्दी होती त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे नाथद्वार जवळ रजसामंद ( राजसमुद्र ) येथे एका विस्तिर्ण जलाशयाला भेट दिली. जलाशयावर भला मोठा संगमरवरी घाट / बंधारा बांधला आहे. घाटावर १६ खांबी ९ चौक्या उभारण्यात आल्या असुन त्यावरचे कलाकुसरीचे काम पहाण्यासारखे आहे. दुपारच्या जेवणासाठी चालकानेच तिथले खास असे कठीयावाडी पद्धतीचे जेवण मिळणा-या हॉटेवर नेले. आजवरच्या प्रवासातले हे सगळ्यात सुंदर जेवळ जेवायला मिळाले होते. इथुन पुढे हल्दीघाटी येथे गेलो. इथल्या मातिचा रंग हळदीसारखा पिवळसर असल्याने ह्या भागाला हल्दीघाटी नाव पडले. तर अकबराच्या सैन्या बरोबर महाराणा प्रताप ह्यांच्या बरोबर झालेली लढाई ह्याच घाटातली. महाराणा प्रताप ह्यांच्या चेतक घोड्याने ह्याच घाटात आपल्या धन्याच्या प्राणासाठी स्वतःच्या प्राण सोडला होता. लढाई मधे दोन्ही बाजुंची मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली होती. चेतक घोड्याचे स्मारक येथे उभारले आहे, तसेच येथे महाराणा प्रताप ह्यांच्या जीवनावर एक लघुपट दाखवण्यात येतो, तर त्यांची काही शत्रास्त्रेही इथे जतन करण्यात आली आहेत. ह्या पुढे आजचे शेवटचे ठिकाण म्हणजे कुंम्भालगड. उदयपुर पासून कुंम्भालगड ८०-९० किमी वर आहे.
आरवली पर्वतरांगेच्या सगळ्यात उंच जागी ह्या किल्ल्याची बांधणी मेवाडचा राजा महाराणा कुंभा ने केली. मेवाड मधील चांगल्या म्हणुन गणाल्याजाणा-या ८६ किल्ल्यांपैकी ३९ किल्ले राजा कुंभाने बांधलेले आहेत. किल्ल्याची तटबंदी पहाण्यासारखीच आहे . ह्या तटबंदीची लांबी ३६ किंमी असून चिनच्या भिंतीनंतरची त्यासारखी ही दुसरी भिंत असल्याचे सांगण्यात येते. गडाच्या माथ्यावर राजमहाल असून तेथे जाणारी संपूर्ण वाट ही तटबंदीने आणी मोठ्या दरवाज्यांनी संरक्षीत केलेली आहे. गडाचे अवशेष खुप चांगल्या अवस्थेत असून त्याची नीट निगा राखली जाते. गडावर अनेक मंदिरे आहेत त्यातले निलकंठेश्वराचे मंदिर आणी त्याचा सभामंडप एकदम अप्रतीमच. संपुर्ण गडाचे भ्रमण करायला किमान ३ दिवस लागतील. संध्याकाळाचे ६ वाजून गेले होते, सूर्यास्ताचे काही फोटो टिपून गड उतरायला सुरुवात केली. एका दुकानात चहा पिण्यासाठी थांबलो असता आजून फक्त अर्धा तास तुम्ही इथे थांबा असे तिथल्या कामगाराने सांगीतले. अंधार पडू लागला तसे गडावरील एक एक वास्तू लाईटच्या प्रकाशाने उजळली जाऊ लागली. गडाच्या माथ्यापासून पायथ्या पर्यंत संपूर्ण गड प्रकाशझोताने दिपला होता. गडावरील मंदिरे, राजवाडा, तटबंदी, दरवाजे नुसते प्रकाशात न्हाहून गेले होते. अक्षरश: डोळ्याचे पारणे फेडणारे ते दृश्या होते. रात्री हॉटेलवर परतलो तरी ते डोळ्यात साठलेले नजारे डोळ्यासमोरून हलत नव्हते.
आज राजस्थान मोहीमेचा शेवटचा दिवस होता. सकाळी जरा निवांतपणेच उठलो. आज उदयपूर शहर परीसराचा फेरफटका मारायचा होता. उदयसिंह राजाने वसवलेले हे शहर खरोखर पहाण्यासारखे आहे पण इथे निवांतपणे फिरायचे असेल तर सुट्टीचा हंगाम सोडून इथे यावे. सकाळी प्रथम हिल टॉप पॅलेस ला गेलो. इथून उदयपुर चे संपूर्ण दर्शन होते. हा राजमहाल शहरापासून एका अंगाला असून आरवली पर्वताच्या पुढ्यात आहे. महालाच्या सभोवतालचा परीसर अभयारण्य म्हणून राखीव ठेवला असून ह्या परीसरात प्रवेश करण्यापुर्वी प्रवेशशुल्क भरावे लागते. महालात पशु-पक्ष्याची माहीती देणारे फलक लावले आहेत. तसेच महालाचे आत फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात येते. महालाच्या मागील बाजूने दिसणारी आरवली पर्वतरांग खुप सुंदर आहे. तिथुन पुढे विविध राज्यातली गाव संस्कृतीची मांडाणी केलेल्या एका रिसॉर्ट मधे गेलो. त्यानंतर सिटी पॅलेस ह्या भव्य राजवाड्यात गेलो. तिथे एक एतिहासीक वस्तुंचे भव्य संग्रहालय आहे. संग्रहालय खरोखर पहाण्यासारखेच आहे. पण आम्ही गेलो तो सुट्टीचा काळ होता त्यामुळे तुफान गर्दी उसळली होती आणी त्या मानाने राजवाड्याची दालने मात्र एकदम छोटी होती, काही ठिकाणी तर गुदमरायचीच पाळी येते. कसे बसे २ तासाने बाहेर पडलो. ह्या राजवाड्यचा आजुन एका भागात क्रिस्टल पॅलेस ही वास्तु आहे, तिथे १०० वर्षा पुर्वीचे विदेशी काचेच्या साहीत्याचे संग्रहालय आहे. क्रिस्टल पॅलेससाठी ४०० रु इतकी प्रवेश फी तर कॅमेरा वापरण्यासाठी ५०० रु. शुल्क आकारले जाते. राजवाड्याच्या मागिल बाजुस तिथले प्रसिद्ध पिचोला सरोवर आहे. सरोवर उत्कृष्ठ पद्धतिने बांधुन काढले आहे. सरोवराच्या मधे लेक पॅलेस नावाचा महाल असुन त्याच्या काही भागात पंचतारांकित हॉटेल आहे. तिथे जाण्यासाठी ३५० रु. शुल्क आकारले जाते. पिचोला सरोवराच्या काठाने फिरताना सुद्धा काही ठिकाणी आम्हाला फोटो काढण्यास मनाई करण्यात आली.
दुपारी उदयपुर मधे एक साध्याश्या हॉटेलमधे दाल-बाटी आणी चुरमा वर मस्त ताव मारला. उदयपुर शहर त्यावेळेस देशी-विदेशी पर्यटकांनी नुसते गजबजून गेले होते. तिथल्या बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. आम्ही सुद्धा त्या गर्दीत सामील झालो. इथे हस्तकलेच्या वस्तु, भित्ती चित्रे, कपडे, आणी इथले राजस्थानचे खास आकर्षण म्हणजे मोझडी प्रकारची पादत्राणे. आमची खरेदी होईपर्यंत संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. उदयपुर मधे महाराणा प्रतापांचे स्मारक उद्यान आहे, तिथे रात्री ७.३० ते ८ पर्यंत ध्वनी-प्रकाश योजनेद्वारे महाराणांच्या आणी मेवाडच्या इतिहासावर माहीती देणार एक कार्यक्रम असतो त्याला आम्ही तिकीटे काढून वेळेत हजेरी लावली. कार्यक्रम अर्थातच छान सादर केला होता. कार्यक्रम संपल्यावर तिथल्या पिचोलाच्या कठावरील चौपाटी नामक एके ठिकाणी बोम्बे पावभाजी स्टॉल वर पावभाजी खाल्ली. आणी खाणे पुर्ण होत नाही तोच लक्षात आले की दिवसभार खरच आपल्याकडे वाया घालवण्यासाठी भरपूर वेळ होता पण आता पुण्याला यायचे असेल तर एक मिनीट सुद्दा वेळ शिल्लक नव्हता. मुबई ला जाण्यासाठी उदयपुर-मुबई सिटी एक्सप्रेस ची सुटण्याची वेळ रात्री ९.३५ ची आहे. आमच्या चालकाने ९.१५ ला स्थानकात आणून सोडले, त्याबद्दल त्याचे आभार मानले. रात्री झोप चांगली लागली लागली, जाग आली तेव्हा गोधरा स्टेशन मागे टाकले होते. दुपारी बरोब्बर २.३५ ला नियोजित वेळेत बांद्रा टर्मिनस ला पोहोचलो तर ९.३० पर्यंत पुण्यात सुखरूप परतलो.
बाकीचे फोटो खालील लिंक वर ......
रणथंम्भोर
धन्यवाद..
-phdixit
(purushottam.dixit@shapoorji.com)
1 comment:
छान लिहिलय..!
.. अरे हा.. फोटोज पण छानच आहेत... मात्र लोड होण्यासाठी बराच वेळ लागतोय..
गूगलचा पिकासा वापरुन बघ .. फास्ट लोडिंग आहे.... गुगल आयडी ने लौगिन करता येते आणि एक जीबी स्पेस मिळतोय... मीही तेच वापरतो!
http://picasaweb.google.com/
Post a Comment