हिंदुत्वाविषयी सांगोपांग चर्चा.

Extract of discussion forum

हिंदुत्वाविषयी सांगोपांग चर्चा.
जीएस | 18 June, 2010 - 11:44
हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र आणि हिंदुसंघटन.

हिंदू म्हणजे कोण ? हिंदुत्व म्हणजे काय ? हिंदुसंघटन म्हणजे कोणाचे संघटन ? या सर्वात जास्त गैरसमज असलेल्या संज्ञांपैकी एक आहेत असे म्हणता येईल. यांची कुठली सर्वमान्य व्याख्या आहे असे नाही. आपण तीन मुख्य व्याख्या अथवा मतप्रवाहांकडे बघूया.

(१) हिंदू म्हणजे सनातन हिंदू धर्म वा धर्मीय.

'सनातन (अथवा वैदिक) धर्म म्हणजेच हिंदू धर्म आणि हा धर्म पाळणारा तो हिंदू' अशी हिंदूची 'हिंदू हा एक धर्म आहे' अशा स्वरूपाची व्याख्या आणि समज आहे. 'हिंदू धर्म' असा उल्लेख केला तर ही व्याख्या डोळ्यासमोर उभी राहते. क्लिष्टता टाळण्याच्या दृष्टीने प्राचीन भारतातली 'धर्म' या शब्दाची ची व्यापक व्याख्या न वापरता इथे व पुढे धर्म हा शब्द 'रिलिजन' या मर्यादित अर्थाने वापरला आहे.

लोकमान्य टिळक म्हणतात,
'प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता
उपास्यानामनियमश्चैतद् धर्मस्य लक्षणम्
धर्ममेनं समालंब्य विधिभि: संस्कृतस्तु यः
श्रुतिस्मृतिपुराणोक्तै: क्रमप्राप्तैरथापि वा
स्वे स्वे कर्मण्यभिरतः श्रद्धाभक्तिसमन्वितः
शास्त्रोक्ताचारशीलश्च स वै हिंदु: सनातनः '

जो वेदप्रामाण्य मानतो, ज्याची उपास्य दैवते वेगवेगळी असू शकतात, उपासनेची साधने वेगवेगळी असू शकतात, मात्र श्रुती, स्मृती, पुराणे यांनी घालून दिलेला वा रुढींनी चालत आलेला आचार जो पाळतो, आपापल्या निहित कर्माला श्रद्धाभक्तीयुक्त भावनेने धरून रहातो तो सनातनी हिंदू अशी ही व्याख्या आहे.
पण हा एक संकुचित अर्थ आहे. हिंदू हा काही केवळ धर्मवाचक शब्द नाही. या धर्मासाठी सनातन धर्म वा वैदिक धर्म हा जास्त योग्य शब्द होईल, आणि तसाच तो पूर्वी वापरला जात होता.

(२) स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्याख्या.

हिंदू हा एक धर्म नाही तर मग काय आहे ? हिंदू हा एक समाज आहे, हिंदू हे एक राष्ट्र आहे हा व्यापक आशय सावरकरांनी 'हिंदुत्व' या नावाचा एक ग्रंथ लिहून अतिशय तपशीलाने स्पष्ट केला आहे. इथे राष्ट्र हा शब्द एकत्वाची भावना असलेला लोकसमूह दर्शवतो, कुठलाही प्रदेश वा शासनयंत्रणा नव्हे.

'आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभुमिका,
पितृभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः '

अर्थात, सिंधुनदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या ही भारतभूमी ज्याच्या पितरांची आणि धर्माची भूमी आहे ते सर्व हिंदू अशी सावरकरांची व्याख्या आहे. या व्याख्येनुसार सनातन वैदिक, अवैदिक, बौद्ध, जैन, शीख... हे हिंदू आहेत. थोडक्यात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू व पारशी सोडून भारतातील इतर सर्व जण या व्याख्येत बसतात. सनातन, बौद्ध, जैन, शीख हे धर्म जरी वेगवेगळे असले तरी त्यांची नाळ ही याच मातीशी आणि संस्कॄतीशी जोडली असलयाने ते सर्व एक समाज आहेत, एक राष्ट्र आहेत असे हे प्रतिपादन आहे.

घटनाकारांनी कायद्याच्या संदर्भात सुद्धा 'नेति' 'नेति' अशी भूमिका घेत जे मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू वा पारशी नाहीत ते हिंदू अशी व्याख्या केली, ती 'एंड रिझल्ट' या दृष्टीने पाहिले तर सावरकरांच्या व्याख्येशी तंतोतंत मिळतीजुळती आहे. हिंदू आणि हिंदुत्वाविषयी स्वा. सावरकरांएवढे सुस्पष्ट तत्वचिंतन त्यांच्या आधी वा नंतरही कोणी केले नाही.

(३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याख्या

स्वातंत्र्यसंग्रामात कार्यरत असतांनाच डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना मुळात मूठभर इंग्रज आपल्याच देशबांधवांना हाताशी धरून एवढ्या खंडप्राय देशावर राज्य कसे करू शकतात ? असा मूलभूत प्रश्न पडला. महंमद बिन कासिम पासून सुरू झालेल्या एक हजार वर्षांच्या इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार काहीवेळा एकेकट्या राजाने शूरपणे केला मात्र अनेकदा पराभवच पत्करावा लागला. असे का झाले ? इंग्रज कुटील बुद्धीभेद करत आहेत त्याप्रमाणे केवळ त्यांच्या एकछत्री अमलामुळे हिंदुस्थान हे एक राष्ट्र झाले, आधी ते नव्हतेच का?

हिंदू हे प्राचीन काळापासून एक समाज, एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आहेत, या राष्ट्रभावनेचा, देशभक्तीचा, राष्ट्रीय चारित्र्याचा क्षय झाल्यामुळेच आपण गुलाम झालो, आपलेच लोक ब्रिटिशांची चाकरी करून आपल्याच देशबांधवांना गुलाम ठेवण्यास सहाय्यीभूत झाले. हिंदू समाजाचे संघटन झाले, हिंदूंमध्ये आपण सारे एक समाज, एक राष्ट्र आहोत ही भावना जागृत राहिली आणि एक एक माणसाचे चारित्र्य असे निर्माण झाले तरच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होईल, स्वातंत्र्य मिळेल, टिकेल आणि देश परमवैभवाकडे जाईल अशी संघनिर्मात्याची संघस्थापनेमागची भूमिका होती. आणि यातूनच १९२५ साली डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार हे द्रष्टे संघटक होते पण त्यांचा पिंड तत्वचिंतकाचा वा लेखकाचा नव्हता. त्यांनी त्यांची वा संघटनेची भूमिका मांडणारे लेखन फारसे कधी केले नाही. 'हिंदू' कोण? यावरही फार चर्चा त्या काळात संघात झाली नाही. स्वा. सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या त्या काळात स्वयंसेवकांना मान्य असावी.

संघाने अजूनही हिंदूची अधिकृत काटेकोर व्याख्या केली नाही आणि करणारही नाही. कारण कुठलीही काटेकोर व्याख्या करून एखादा मनुष्य हिंदू आहे की नाही अशी त्याला कसोटी लावणे हेच मुळात हिंदू इथॉसच्या विरोधात आहे. पण अनेकदा स्पष्ट झालेल्या भूमिकेवरून हे म्हणता येईल की संघ हिंदू या शब्दाकडे 'धर्म' या दृष्टीने अजिबात बघत नाही. संघाच्या दृष्टीने 'हिंदुत्व' हे धर्माचे नसून या देशाच्या राष्ट्रीय प्रवाहाचे नाव आहे. 'जो या देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती आपली मानतो, या देशाला आपली मातृभूमी मानतो तो हिंदू, मग त्याची उपासनापद्धती वा धर्म कुठलाही असो. आणि असे सर्व हिंदू हे धर्म, भाषा, चालीरीती यात कितीही विविधता असली तरी एक समाज, एक राष्ट्र आहेत' या शब्दात संघाची हिंदू आणि हिंदुत्वाबद्दलची धारणा व्यक्त करता येईल. यात एखादा मुसलमान वा ख्रिश्चनही हिंदू समाजाचा, संस्कृतीचा वा हिंदूराष्ट्राचा घटक व्हायला कुठलीच आडकाठी नाही वा कुठला दुय्यम दर्जाही नाही, त्या अर्थाने ही धारणा सर्व व्याख्यांमध्ये सर्वात व्यापक आहे असे म्हणता येईल.

१९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने साधारण हीच भूमिका उचलून धरत हिंदू या शब्दाला व्यापक अर्थ आहे. त्यातून भारतीय संस्कृतीचा, जीवनासरणीचा वा मनोवस्थेचा बोध होतो असा निवाडा दिला आहे.

हे प्रश्न हिंदू संघटना, हिंदुत्ववाद यांबद्दलचे आहेत. संघ आणि संघाच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संस्था हे आज तरी सगळ्यात मोठे हिंदुसंघटन आहे. त्यामुळे जिथे मुद्दाम वेगळा उल्लेख केला नसेल तिथे हे विवेचन या संस्थांबद्दल आहे.

हिंदुत्ववाद वा संघ याबद्दल बर्‍याच जणांच्या कल्पना, प्रश्न हे ऐकीव, विरोधकांनी पसरवलेल्या माहितीवर आधारित असतात. सगळ्यांनाच अधिकृत माहितीचा स्त्रोत उपलब्ध असतो असे नाही, त्यातून या धारणा अधिकाधिक घट्ट होत जातात. भारतात नथुराम ने केलेल्या गांधीहत्येपासून ते आजपर्यंत कुणीही हिंदू हे नाव घेउन काहीही केले की ते धरून संघाला बदनाम करण्याचे कार्य प्रसारमाध्यमे आणि विरोधक करत आले आहेत. त्याचाही मोठा परिणाम झालेला असतो. त्यामुळे मी इथे जे लिहिणार आहे ते कदाचित फार धक्कादायक वाटू शकेल. खरच इतके साधे आणि सोपे आहे का ? असे वाटेल. पण तेच १०० टक्के सत्य आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि त्यामुळे या सत्याच्या प्रकाशात, वर्षानुवर्षे मनात उभ्या राहिलेल्या या चळवळीबद्दलच्या आपल्या प्रतिमेला छेद जात असेल वा आपल्याच मनाशी आपण पक्की केलेली भूमिका बदलायला हवी असे वाटत असेल तर तसे प्रांजळपणे, मोकळेपणाने करा अशी माझी सर्व सुजाण वाचकांना विनंती आहे.

(१) हिंदुराष्ट्र करायचे आहे म्हणजे काय करायचे आहे ?
>>हिंदुत्ववाद हा लोकशाहीविरोधी आहे का? किंवा हिंदुत्ववाद मनुचे सनातनी हिंदु राष्ट्र आणन्यासाठी >>बनवलेली विचारसरणी आहे का?मुस्लिम्,ख्रिश्चन या सर्वांना मारुन टाकणे अथवा हाकलुन देणे हे >>हिंदुत्वाचे लक्ष्य आहे का? किंवा हिंदुत्ववाद हा भारताला १६व्या अथवा १७व्या शतकात घेउन जाणार >>आहे का??किंवा हिंदुत्ववाद भारताला 'हिंदु पाकीस्तान' बनवण्यासाठी आहे का??
>>हिंदुराष्ट्र हा शब्द अनेकदा वापरला जातो,इंग्रजी वर्तमानपत्र याचा अर्थ घेतात की हिंदुराष्ट्र म्हणजे >>सर्व अल्पसंख्यांकांना मारुन टाकणे अथवा देशातुन हाकलुन देणे.जेंव्हा संघाचे लोक हिंदुराष्ट्र शब्द >>उच्चारतात तेंव्हा लगेच ते काय हे दोन वाक्यात सांगितले तर काय हरकत आहे?

मुळात आपल्याला हिंदुराष्ट्र करायचे आहे अशी संघाची धारणा नाही. हे वाक्यच हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी लाखो वेळा वापरले गेले आहे. आपण हिंदूराष्ट्र आहोतच अशी संघाची धारणा आहे. किमान ५००० वर्षांची कंटिन्युईटी असलेला इतिहास, परंपरा, संस्कृतीचा प्रवाह यांनी आपण सर्व जोडले गेलो आहोत, आपण एक आहोत (केवळ ब्रिटिशांनी राज्य केले म्हणून नाही) असा हा एकत्वाचा धागा म्हणजे हिंदुराष्ट्रवाद आहे. हिंदुत्व हा काही कोणाचा धर्म नाही, ते आपले राष्ट्रीयत्व आहे. 'चला, ते ओळखू आणि आपण जात-भाषा-प्रांत-धर्म भेदभाव विसरून एक होऊ' अशी ही हाक आहे. हिंदुराष्ट्र यात निर्माण करण्यासारखे काय आहे ? राष्ट्र असे निर्माण करता येते काय?

एक वेळ 'हिंदुराज्य' निर्माण करता येऊ शकते. पण संघाच्या हिंदुत्वाला ते नको आहे. 'धर्मनिरपेक्ष लोकशाही' याच राज्यव्यवस्थेचा संघ नि:संदिग्ध पुरस्कर्ता आहे. एकदा हे स्पष्ट असेल तर सनातन धर्म परत आणणे, जुन्या परंपरा, संस्कृतीची सक्ती, मुसलमान व इतरांना दुय्यम स्थान वगैरे बागुलबुवा किती निरर्थक आहे हे लगेच लक्षात येईल.

राष्ट्र आणि राज्य (स्टेट [ पुन्हा, स्टेटचे दोन अर्थ होतात, इथे महाराष्ट्र स्टेट या अर्थाने नाही, तर शासन वा राज्यपद्धती या अर्थाने राज्य हा शब्द वापरला आहे]) यातला फरक समजून न घेता, किंवा तो सगळ्यांना कळतोच असे नाही याचा फायदा घेउन केला गेलेला हा फार मोठा अपप्रचार आहे.

(२) संघ स्वयंघोषित संस्कृतीरक्षक आहे का ?
>>हिंदुत्व ही गेल्या ५००० वर्षांपासुनची संकल्पना आहे असे अनेकदा म्हणतात.आता याचा अर्थ काय्?>>स्त्रीया आणि दलित यांना पुन्हा १००-१५० वर्षापुर्वीच्या काळात हिंदुत्ववाद घेउन जाणार का??
>>मागे श्रीरामसेनेच्या लोकांनी पबमधल्या मुलींना मारले...

आता याचा अर्थ एवढाच की अनादि कालापासून आपण एकच आहोत. ती संस्कृती वा परंपरा पुन्हा पुनुरुज्जीवित कराव्यात असे अजिबात म्हणणे नाही. आजच्या काळाच्या दृष्टीने जे जे वाईट ते सोडून द्यावे जे चांगले ते ठेवावे वा आत्मसात करावे अशीच भूमिका आहे. त्यामुळे स्त्रीयांना वा दलितांना दुय्यम स्थान असल्या त्याज्य कल्पनांचा संघ दुरान्वयेही पुरस्कार करत नाही.

श्रीरामसेनेच्या लोकांनी पबमधल्या मुलींना मारले या घटनेवरची संघाची प्रतिक्रिया संघाचा मानस स्पष्ट करते. माजी संघ प्रवक्ते राम माधव मुलाखतीत तीन गोष्टी म्हणाले,
(१) अशा प्रकारे मारपीट करणे करणे ही मूर्खता आहे, अतिशय निषेधार्ह आहे, आम्ही याचा कडक निषेध करतो.
(२) श्रीराम सेना हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हे करत आहे असे म्हणते. मुलींना असे मारणे ही कुठली हिंदू संस्कृती आहे ? कुठल्या हिंदू संस्कृतीचे ते रक्षण करत आहेत ?
(३) मात्र हे तुम्ही पबचे समर्थन समजू नका. पबमध्ये दारु पिऊन, कमीत कमी कपडे घालून नाचणे हे मला काही चांगले वाटत नाही. त्यामुळे मी ते करणार नाही व माझ्या बहिणीने वा भावाने असे करावे असे मला वाटत नाही. इतरांनी पण ते करू नये असे वाटत असेल तर ते माझे मत सांगण्याचे मला स्वातंत्र्यही आहे आणि सांगण्याचे अनेक मार्ग आहेत. मारपीट हा नक्कीच तो मार्ग नाही.

(३) संघाची दलितांबद्दलची भूमिका
>> 'संघात शेजार्‍याची जात विचारली जात नाही' वगैरे उत्तर असते
>>हिंदुत्ववाद जातीनिर्मुलनाच्या विरुध्द आहे का??
>>आतापर्यंतच्या हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू स्त्रिया व शूद्रांवर, दलितांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द लढा >>देऊन ते ज्याप्रमाणे भारतीय कायद्यानुसार समान आहेत त्याप्रकारचा दर्जा त्यांना धार्मिक जीवनातही >>देऊ केला आहे काय? कारण जर हिंदू धर्माची आगेकूच होणे गरजेचे असेल तर जे दुर्लक्षित आहेत >>त्यांना त्यांचा हक्काचा सन्मान प्राप्त करुन देणे हेही धर्माच्या जोपासनेचे महत्त्वाचे अंग ठरते. त्यासाठी >>हिंदुत्ववादी काय करत आहेत? ( अ.कु.)

(अ)हिंदुसंघटन हे ज्यांचे ध्येय आहे, ते कुठल्याच परिस्थितीत जातीभेदाला थारा देणार नाहीत हा खरं तर कॉमन सेन्स आहे. पण तरीही त्या विरोधी प्रचार केला जातो, आणि काहींना पटतोही.
(ब)अगदी आरंभापासून ते आजपर्यंत काटेकोरपणे संघात पाळले गेलेले सूत्र म्हणजे- आपली जात एकच हिंदू. जातीचा उल्लेखच नको.
(क)१९३२ साली वर्ध्यात हिवाळी शिबिराला आलेले गांधीजी किंवा १९३८ साली पुण्याच्या शिबिरात आलेले डॉ. आंबेडकर यांनी खरेच दलितांसह सर्व जातींचे स्वयंसेवक एकत्र रहातात, जेवतात, खेळतात याबद्दल समाधान आणि संघाने हे कसे जमवले याबद्दल कुतुहल व्यक्त केले होते. जातिनिर्मुलनाचा बडेजाव नाही तर सहजभाव हे मला तरी व्यक्तीशः संघाचे मनाला सगळ्यात स्पर्शून गेलेले काम आहे.
(ड)अगदी आताही सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना आवाहन केले आहे की त्यांनी जनगणनेत जात नोंदवू नये, स्वयंसेवक ते मानतील यात मला तरी काहीच शंका वाटत नाही.
(ई)दलित, अनुसुचित जमाती अशा सर्व मागास वर्गांसाठीच्या आरक्षणाला संघाने नि:संदिग्ध पाठिंबा तर दिलाच आहे पण सवर्णांनी हे मनापासून मान्य करावे, केवळ कायदा म्हणून नव्हे यासाठी फार मोठे प्रयत्न केले आहेत. (माझी यासंदर्भातली एक अतिशय हृद्य आठवण मी विस्तारभयास्तव येथे देत नाही, नंतर लिहिन.)
(फ) संघ साधूसंतांच्या नादी का लागतो ? असे विचारले जाते. पण या साधुसंतांना एकत्र करून शंकराचार्यांसह सगळ्यांना गोळा करून 'सर्वे हिंदू सहोदरा, न हिंदु पतितो भवेत' अशी घोषणा संघाने करुन घेतली. अस्पृश्यता वा जातिभेदविरोधातले हे या देशातले सगळ्यात महत्वाचे काम होते.
(ग) दक्षिणेत मंदिरात दलित पुजारी नेमण्यासाठीचे प्रशिक्षण संघाच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. दलित पुजारी नेमण्याला काही ढुढ्ढाचार्यानी कोर्टात आव्हान दिले. ती काय्देशीर लढाई संघ लढतो आहे.
(ह)तथाकथित पुरोगामी चळवळ ही ब्राम्हण ब्राम्हणेतर वादाला खतपाणी घालून समाज तोडण्याच्या कामात मग्न असतांना संघ मात्र सामाजिक समरसता मंचासारख्या उपक्रमाद्वारे समाजाच्या प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचा, त्याची उन्नति घडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अक्षरशः शेकडो नाही हजारो उपक्रम आहेत, किती लिहिणार ? दोन उदाहरणे देतो.
(ज)पारधी समाजात मोठे काम उभे केले आहे ती गिरीश प्रभुणे यांची भटके विमुक्त विकास परिषद ही संघ योजनेतून, प्रेरणेतून सुरू झालेली संस्था आहे.
(ल)कालच बेरड, रामोशी, देवदासी समाजात अविरत राबून सुधारणा, वि़कास, न्याय मिळवून देणारे डॉ. भीमराव गस्ती यांचा पुण्यात कार्यक्रम झाला. त्यांची बेरड, आक्रोश ही पुस्तके वाचली असावीत कदाचित. गस्ती म्हणाले, 'तथाकथित पुरोगामी प्रत्यक्ष कामात मदतीला नाही आले, संघ आला, स्वयंसेवक आले, या जातीपातींच्या कल्याणासाठी झटणारा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणारा संघ जातीयवादी कसा ? हे मला कळलेले नाही.'

(४) वनवासी, धर्मांतर रोखणे यात संघ काय विधायक करतो आहे का ? किती करतो आहे ?
>>रिकाम्या पोटी व रिकाम्या हाती देव, धर्म सुचत नाहीत.
>>गरीब, अनाथ, परिस्थितीने पोळलेल्या हिंदूंसाठी हिंदू धर्मवादी व संघटना त्या लोकांना रोजगार >>मिळवून देण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी व त्यांचे दाणापाणी >>करण्यासाठी किती प्रमाणात व कश्या प्रकारे कार्यरत आहेत? ज्या भागांमध्ये सर्रास धर्मांतराचे प्रकार >>घडतात तिथे हिंदू चळवळीचे अग्रणी किती प्रमाणात पोचले आहेत?

वनवासी, इशान्येकडील राज्ये यांचे घाऊक धर्मांतर करून त्यांना भारतापासून तोडण्याचे फार मोठे कारस्थान चर्चने रचले आहे. अव्याहत काम चालू आहे. संघ काय करतो आहे ?

(अ) स्वातंत्र्य मिळाल्यावर मध्यप्रदेशचे पहिलेच मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांना जेंव्हा पहिल्याच जशपूर दौर्‍यात इतरत्र सर्वत्र ऐकू येणार्‍या 'भारतमाता की जय' च्या ऐवजी 'जय येशू !, शुक्लाजी वापस जाव' असे ऐ़कावे लागले तेंव्हाच सरदार पटेलांना समस्येचे गांभीर्य कळले. तेंव्हा ख्रिश्चन मिशनरी कामाचा हा प्रभाव मोडून काढण्यासाठी एक 'बॅक्वर्ड एरिआ वेल्फेअर स्किम' सुरू झाली. तिचे पुढे सरकारि योजनांचे जे होते तेच झाले पण त्या सिमचे एरिआ ऑर्गनायझर बाळासाहेब देशपांडे यांनी परिस्थितीची भीषणता ओळखून वनवासी शिकले, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत यासाठी १९५२ सालीच संघाच्या प्रेरणेने वनवासी कल्याणाश्रमाची स्थापना केली.
आज हॉस्टेल, ग्रामविकास, आरोग्य, शाळा असे ४८२३१ वनवासी गावांना फायदा करून देणारे १४४६७ प्रकल्प वनवासी कल्याण आश्रमाने उभे केले आहे. आकडा पुन्हा एकदा बघा चौदा हजार चारशे सदुसष्ट प्रकल्प. एक समाजिक प्रकल्प उभा करुन चालवणे हे काय दिव्य असते हे ज्यांनी पाहिले आहे त्यांना याचे महत्व कळेल.

(२) अनेक वनवासी पाडे इतके दुर्गम आहेत की तिथली मुले मोठ्या वनवासी गावात शालेत येऊ शकत नाहीत. शाळाही आठ दहा मुलासांठी कशी उघडणार ? आरोग्याचे काय ? या सगळ्यावर उपाय म्हणून एकल विद्यालय ही एक शिक्षकी शाळेची कल्पना निघाली. एका कार्यकर्त्याने पाड्यावर राहून शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास याकडे लक्ष द्यावे ही कल्पना. पुन्हा या पाड्यांशी शहरातल्या कुटुंबांनी जोडून घ्यावे ही योजना. किती आहेत ही विद्यालये १० ? १०० ? आज २७,०४१ एकल विद्यालयात साडेसात लाख वनवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

(३) नुसते नागालँड, मेघालय, मिझोराम वगैरे 'गेले' असे बोलणे हे संघाचे काम नाही. तिकडे सामाजिक कामाला मनुष्य गेला की त्याची हत्या असे चर्चप्रणित दहशतवादी संघटनांचे धोरण असताना. जीवावर उदार होऊन संघ, विहिप, कन्यानुमारीचे विवेकानंद केंद्र, अभाविप चे कार्यकर्ते हजाराहून अधिक प्रकल्प चालवत आहेत. एवढेच नव्हे तर 'भारत मेरा घर' सारखे प्रकल्प राबवून तिकडच्या हजारो मुला मुलींना इकडे आणणे, शिक्षणाची, रहाण्याची व्यवस्था करणे आणि आपण सारे एक आहोत याचा प्रत्यय देउन मग पुन्हा त्यांच्या राज्यात परत जाऊन तिकडे काही उद्योगधंदा, वा सामाजिक काम करण्यास प्रवृत्त करणे आणि तिकडची नाळ भारताशी जोडून ठेवणे हे संघ करतो आहे. एकेका प्रांताच्या कार्यकर्त्यांनी एकेका राज्याची जबाबदारी घेतली आहे

कारण हे सगळे 'आपले' आहेत असे संघाचा हिंदुत्ववाद सांगतो. हिंदुत्वाच्या व्याख्येतला सगळ्यात महत्वाचा शब्द कुठला असेल तर तो इतिहास, परंपरा, संस्कृती वगैरे नाही तर 'आपला' हा आहे. कारण एकदा हे सगळे लोक 'आपले' आहेत असे म्हटले की बघण्याचा दृष्टीकोणच बदलतो.

संघाने काय केले ? अजून काय करत राहिल ? यावर एक एक उदाहरण घेउन लिहू लागलो तर पुस्तके भरतील. हे एवढे सगळे वाचूनही अंतर्मुख न होता 'पण मग हे का नाही केले ?' 'हे पण करा !!' वगैरे स्वतः काही न करता फुकाचे सल्ले देणार्‍यांच्या लेखनानेही पाने भरतील. पण आपण काही करणार आहोत की नाही हा आता प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करण्याचा प्रश्न आहे.

हे काम किती प्रचंड आहे याची ही फार छोटी झलक आहे. ज्यांना प्रत्यक्ष बघायचे आहे, अजून जाणून घ्यायचे आहे, मदत करायची आहे, सहभागी व्हायचे आहे त्यांनी जरूर संपर्क साधा. 'पुन्हा कधीतरी..' ची वाट बघू नका असे माझे या निमित्ताने सांगणे आहे.