Thursday, April 23, 2009

दक्षिण कोल्हापुर

एकदाचा ट्रेक ठरला !! ह्या वेळेस पाडवा शुक्रवारी आल्यामुळे सलग तिन दिवस सुट्टी मिळणार होती त्याचा फायदा घ्यायचे ठरले. जी.एस. ने नेहमीप्रमाणे परिपुर्ण आखणी केली होती. कोल्हापुरच्या दक्षिण भागातील काही किल्ल्यांना भेट देण्याचे ठरवले होते. त्यामधे मुख्यत्वेकरून भुदरगड, सामानगड, महिपालगड, पारगड आणी रांगणा ह्या किल्ल्यांचा समावेश होता. पुण्यातून मी (सचिन), जी.एस. (गोविंद), आरती, सुभाष आणि मुंबईतून साधना, पंकज आणी अन्वया असे एकुण सात जण तयार झालो तर संपुर्ण प्रवासात स्वानंद हा आमच्या सुमोचे सारथ्य करणार होता.




शुकवारी रात्री १०.०० ला पुणे सोडले शिरवळ - खंडाळा ओलांडेपर्यंत मागे बसलेले सर्व लोक झोपी गेले होते. सातारा - उंब्रज - कराड मागे टाकत १.३० वाजता कोल्हापुर गाठले पुढे कोल्ह्यापुरातील रंकाळा उजव्या बाजूला ठेवत गारगोटी - पाल मार्गे पहाटे ३.३० ला भुदरगड ह्या पायथ्याच्या गावा जवळ पोहोचलो. ह्या गावातून रस्ता थेट गडावर जातो, पण ह्या रस्त्यात मधेच मांडव बांधला होता, तर आपण जातो आहोत तो रस्ता बरोबर आहे का नाही ह्या बद्दल थोडी शंका वाटत होती. गावाच्या सुरवातीला एक कच्चा रस्ता आम्ही पाहीला होता त्या रस्त्याने जाण्याचे ठरवले माघारी फिरलो. रस्ता कुठे जातो हे नक्की माहिती नसले तरी निदान त्या मांडवाच्या पुढील भागात जाणारा रस्ता शोधायचा होता. पण काही अंतरानंतर वळसे घेत तो कच्चा रस्ता आम्हाला थेट गडावर घेउन गेला. गडावरील तळ्याच्या बाजूने पुढे जाउन तिथल्या महादेव मंदिरत पथा-या पसरल्या, पहाटेचे ४.१५ वाजले होते. सकाळी ६.१५ ला उठलो आणी लगेचच गडप्रदक्षिणेस सुरवात केली, उजाडले होते पण सुर्योदय मात्र आजुन झाला नव्हता. गड १६६६-६७ मधे स्वराज्यात आला.




गडाला ५-७ फुट रुंदी असलेली तसेच काही ठिकाणी १० ते १२ फुट उंची असलेली तटबंदी आहे. काही ठिकाणी ती पुर्ण उद्वस्त झालेली आहे तरीपण किल्ल्याचा बराच भाग तटबंदीवरुन फिरता येतो. तटबंदीवरून फिरताना बुरुज, चोर दरवाजे व इतर दरवाजे दिसतात. गडाच्या पुर्व बुरुजावर पोहचते वेळेस अतिशय सुंदर सूर्योदय पहायला मिळाला. गडाखालील रानातून वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. गडाखालील भागात अतिशय दाट झाडी होती. तटबंदीवरून फिरता फिरता गडप्रदक्षिणा पुर्ण होत आली, मग गडाच्या मध्यावर असलेल्या आणी भुदरगडाचे मुख्य आकर्षण असलेल्या तिथल्या तळ्यावर गेलो. गडाच्या मध्यभागी असलेले हे तळे जवळ जवळ कात्रजच्या तळ्याच्या आकाराचे असून काही बाजूने बांधून काढलेले आहे. तळ्यातील पाणी दुधी रंगाचे असून तो तिथल्या मातीचा रंग असल्याचे म्हणले जाते. गडावर जिरायती शेती होत असल्याचे आढळून आले, त्यामुळेच कदाचीत गडावर मोठे सावली देणारे वृक्ष दिसले नाहीत. गडावर आजून एक तळे असुन ते पुर्णतः कोरडे पडले आहे. संपूर्ण गड पहायला २ ते ३ तास लागतात. ८-८.१५ ला गड उतरलो. आज गुढीपाडवा होता गावातील अनेक घरांच्या दारापुढे वैसिष्ठापुर्ण अश्या गुढ्या, तोरणे बांधून नववर्षाचे स्वागत केले होते. पुढे गडहिंग्लज येथे १०.४५ वाजे पर्यंत पोहोचलो. इथे थोडा विसावा घेत तिथून जवळच ५-७ किमी वर असलेल्या सामानगड ह्या किल्ल्याच्या दिशेने निघालो.




सामानगड ला जाण्यासाठी गडहिंग्लज वरुन चिंचेवाडी ला जावे लागते. चिंचेवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. इथे संपुर्ण किल्ल्याच्या वरपर्यंत तसेच अंतर्भागातही डांबरी रस्ते बांधून काढले आहेत. किल्ल्याला मोठी तटबंदी असून आता किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती करण्यात आली आहे. पर्यटनक्षेत्र म्हणून ह्या किल्ल्याचा विकास करण्यात आला आहे. गडावर पर्यटकांना रहाण्यासाठी तसेच जेवण, गडाची माहीती देणारे फलक इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. गडावर पोहोचलो तेव्हा ११.३० वाजून गेले होते. कधी चालत तर कधी गाडीतून गडाचा पेरफटका मारायला सुरुवात केली. प्रथम झेंडा बुरुज ,वेताळ बुरूज त्यानंतर सोंडी बुरुज व अन्य लहान आकाराचे बुरुज दिसले. इथले मुख्य आकर्षण म्हणजे चौकोनी आकारात जांभ्या दगडात खोदून काढलेली हनुमान विहीर, विहीरीची खोली ३०-४० फुट असून खालपर्यंत जाण्यासाठी प्रशस्त असा पाय-यांचा रस्ताही खोदकाम करून बनवला आहे. जस जसे आम्ही खाली उतरत गेलो तसे तिथला गारवा जाणवला. खाली पाणी होते पण त्यातील गाळ काढण्याचे काम चालू असल्यामुळे पाण्याला लालसर रंग आला होता. मग साखर विहिर पहायला गेलो, तिथे सुद्धा एका मोठ्या चौकोनी खड्यात लहान चौकोनी विहिर खोदली होती. विहिर कोरडी पडली होती. मग आंधार कोठडी पहायला गेलो. एका खणून काढलेल्या पाय-यांच्या वाटेने १०० फुटा पर्यंत खाली उतरुन जावे लागते तिथेपर्यंत सूर्यप्रकाश आत येतो, पुढे रस्ता डावी कडे वळून आजून १५-२० फुट खाली उतरला आहे. खाली पाणी असून पाण्याखालून रस्ता पुढे गेलेला आहे. उजेडासाठी येथे पाण्याच्या अलीकडे व पलिकडच्या बाजूने झरोका खोदलेला आहे. तिथे जवळच भवानीमातेचे मंदिर असून सध्या त्याचे नुतनीकरण चालू आहे. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचे गर्वहरण केले ती गोष्ट ह्याच गडावर घडल्याचे सांगण्यात येते, ते ठिकाणही किल्ल्यावर निर्देशीत केले आहे. किल्ल्याचा वापर हा मुख्यतः भोवतालच्या लढाऊ किल्ल्यांना रसद पुरवण्यासाठी केला जात होता. ह्या डोंगररांगेच्या उत्तर भागात एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून मुर्ती अतिशय सुरेख आहे. दुपारचे २ वाजत आले होते, भुक लागली होती मग तिथे मारुतीरायांच्या पुढे नारळ वाढवला आणी काही क्षणात तो फस्तही झाला. मंदिराच्या जवळच जमिनीखाली खोदून काढलेल्या खोल्या असून त्या रामायण कालीन असल्याचे सांगितले जाते. सध्या तेथे राममंदिर आहे. इथून पुढचे मोठे गाव चंदगड येथे जाण्यासाठी दिड तास लागणार होता म्हणुन परत गडहिंग्लज ला गेलो तिथे एका चांगल्या हॉटेल मधे पोटभर जेवण केले, आणि जेवणानंतर सोबत नेलेले श्रीखंड. पुढचा प्रवास लगेचच सुरु केला. गडहिंग्लज चंदगड रस्त्यावर नेसरी येथे छत्रपती शिवाजी राजांचे पहीले सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणी त्यांच्या सहा सहका-यांचे भव्य स्मारक आहे. अदिलशहाचा सरदार बहलोलखान ह्याच्या छावणीवर ह्या फक्त सात विरांनी हल्ला केला होता, त्यामधे हे सातही विर मरण पावले (२४ फेब. १६७४). दुपारचे ४ वाजले होते, तिथे थोडावेळ थांबून पुढे गर्द हिरव्या झाडांच्या सावलीतून जाण्या-या रस्त्याने चंदगड च्या दिशेने प्रवास सुरु केला.




पुढचा किल्ला काळनंदीगड किंवा महिपालगड करायचा होता वेळेअभावी दोन्हीपैकी एकाच किल्ल्यावर जाता येणार होते. मग जवळ असलेल्या महीपालगडावर जाण्याचे एकमताने ठरले. गडावर वरपर्यंत गाडी जाते. इथले वैजनाथाचे मंदिर एक पुरातन तिर्थक्षेत्र म्हणुन नावजलेले आहे. मंदिर मागे टाकत ५.४५ ला वाटेवर असलेल्या एका गुहेपाशी पोहोचलो. गुहेमध्ये एकूण तिन उप गुहा स्पष्टपणे दिसतात त्यातिल समोरील गुहेत गेल्यावर १० ते १५ फुट आतवर जाऊन गुहा संपते तिथे चौकोनी आकाराची खोली आहे. डावीकडच्या गुहेमधे प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस आजून एक छोटी गुहा आहे. पुढे ही गुहेतील वाट समोरून दिसणा-या गुहेच्या मागच्या भागात घेऊन जाते. तिथे एक ध्यान गुंफा असुन एक शिवलिंग व त्रिशुळ तिथे आहे. गुहेची उंची ४ ते ५ फुट असून आत जाताना विजेरी नेणे गरजेचे आहे. आत लहान आकाराची वटवाघुळे आहेत. या गुहेतुन बाहेर पडल्यावर उजव्या बाजूच्या गुहेमधे गेलो. गुहेमधे खाली उतरत जाणा-या पाय-या असून ४० पाय-या उतरून गेल्यावर डावीकडे पाण्याची विहीर आहे.

पुढे महिपालगडावर गेलो. संपुर्ण गडावर वस्ती असून त्यांनी तो गड व्यापून टाकला आहे. गडावर काही बुरुज आणी तुरळक ठिकाणी तटबंदी शिल्लक आहे. एका बुरुजावर बसून तिथून दिसणारा सूर्यास्त पाहीला. संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. खाली उतरून आल्यावर वैजनाथाचे दर्शन घेतले व एके ठिकाणी (पाटणेहात फाटा) चहासाठी थांबून पुढचे मुक्कामाचे ठिकाण असलेल्या पारगडाच्या दिशेने प्रवास सुरु केला. दाट जंगलभागातून हा रस्ता जातो त्यामुळे आंधार असूनही गाडीच्या प्रकाशात काही वन्य जीव दिसतील ह्या आशेने पहात होतो. एक ससा दिसला पण त्या नंतर मात्र आमची निराशाच झाली. ह्या भागात उंदीर मात्र प्रचंड संख्येने दिसले, नुसता सुळसुळाट होता त्यांचा. रात्री ९.३० च्या आसपास गाडीत बसूनच गड चढायला सुरुवात केली अतीशय वेडीवाकडी वळणे घेत रस्ता वरपर्यंत जातो. गडावर ४०-५० कुटूंबांची कायमस्वरूपी वस्ती असून ह्या गडाचे सुद्धा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचे काम चालू आहे. गडावरील एका घरात जाऊन आम्ही बरोबर आणलेले स्वयंपाकाचे जिन्नस देवून पिठले भाकरी आणी भात असे पदार्थ तयार करून घेतले आणी त्यावर यथेच्छ ताव मारला सोबत लसणाची चटणी आणी श्रीखंड होतेच. मंदिराच्या ओसरीमधे झोपलो.




सकाळी ५.३० ला जागे झालो. थोडेसे उजाडल्यावर पाण्याचा शोध घेऊन सकाळचे कार्यक्रम उरकून घेतले. सकाळी ६.३० ला गडप्रदक्षिणेला सुरवात केली. गडावर येणारी पाय-यांची वाट , महादेव मंदिर, पाण्याची काही तळी पहात ब-याचप्रमाणात मोडकळीस आलेल्या तटबंदीवरून तासाभरातच गड फिरुन होतो. ह्य गडाचे वैसिष्ठ म्हणजे ह्या किल्ल्याच्या एका बाजुला महाराष्ट्र, दुस-या बाजुला कर्नाटक आणी गोवा अश्या राज्यांच्या सिमा येऊन मिळतात. गडावरून दिसणारी डोंगररांग, तिलारी नदीचे खोरे लक्षवेधक आहेत. तिथेच नाष्टा करून पुढचा प्रवास सुरू केला सकाळचे ८.४५ वाजले होते. पुढे दिड तासाच्या प्रवासाने चंदगड मार्गे अंबोली गाठले. इथे पंकजचे घर होते, त्यामुळे आमची आंघोळीची सोय झाली. १२ वाजता आंबोली सोडले आणी १ वाजेपर्यंत सावंतवाडीला पोहोचलो. इथली राजू भालेकर यांची खाणावळ शाकाहारी-मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच जेवणही चांगले होते. मुंबई गोवा हमरस्त्याने पुढचा प्रवास सुरू केला कुडाळ पासुन नारूर ह्या गडाच्या पश्चिम बाजूचे पायथ्याचे गांव. स्वानंद सहीत सर्वांनी आपापल्या पाठीशी बॅगा घेतल्या. गावात गडाच्या वाटेबद्दल थोडी चौकशी करून गड चढायला सुरवात केली. दुपारचे ४ वाजले होते. वाट अवघड नव्हती तरी कोकणातली दमट हवा आणी ४ वाजले तरी सुद्धा तळपणारा सूर्य ह्यामुळे तब्बल अडीच तासांच्या चढाईनंतर सूर्यास्तासमयी गडावर पोहोचलो. सूर्यास्त होईपर्यंत तिथे बुरूजावर बसलो आणी मग रांगणाई देवीच्या मंदिरात गेलो. मंदिरा समोर मोठी सुबक दिपमाळ आहे. देवळाला कौलारू छत असून १२ ते १५ लोक आत आरामशीरपणे निजू शकतील एवढे मोठ्या आकाराचे आहे. देवळात देवापुढे कोणीतरी समई पेटवली होती. गडावर वस्ती नाही पण गड पहाण्यासाठी ब-यापैकी लोक येत असतात. गडावर आंधार पडला होता, आजून दोन गृप तिथे गडावर मुक्कामी होते पण त्यांनी मुक्कामासाठी तळ्याच्या काठाची जागा पकडली होती.




बरोबर नेलेले स्वयंपाकाचे साहित्य बाहेर काढले. स्वानंदने पुरेसे सरपण गोळा केले होते. मग मी आणी पंकजने चुल पेटवली, साधना ने भाक-या केल्या. आरती ने रस्साभाजी आणी भात केला तर सुभाष आणि अन्वया ने भाज्या चिरण्याचे काम केले. मग सगळे तुटून पडले खुप चविष्ट जेवण झाले होते. जेवण होईस्तोवर शेकोटी पेटवण्यात आली, त्यामागे महत्वाचे कारण होते अन्यथा शेकोटी पेटवण्याची गरज भासत नाही. गडावर तसेच खालच्या भागात जंगल असल्यामुळे तिथे वन्य प्राण्यांचा मुखत्वेकरून अस्वलांचा वावर गडावर असतो. जेवण होईपर्यंत १०.३० वाजून गेले होते. सकाळी लवकर उठण्याच्या दृष्टीने लगेच झोपी गेलो.




सकाळी ६.३० ला जाग आली, उजाडले होते. मग तळ्यावर जाऊन कालची भांडी धुणे तसेच सकाळची इतर महत्वाची कामे उरकून घेतली. बरोबरचे सामान देवळातच ठेऊन गडप्रदक्षिणेस सुरूवात केली. १६६६ मधे हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला व त्याचे नमकरणही महाराजांनी प्रसिद्धगड असे केले. देश आणी कोंकण ह्यांच्या सिमेवरील रांगणा हा एक महत्वाचा किल्ला समजला गेला. अनेक लढाया ह्या किल्ल्याने पाहिल्या आहेत. प्रथम आम्ही गडाच्या पुर्वेला असलेल्या देशावरून गडावर येणा-या मुख्य दरवाजकडे गेलो, तिथला बुरुज प्रचंड मोठा आहे. गडाच्या ह्या भागात काही भग्न बांधकामे दिसली. मग तसेच पुर्व कड्यावरून चालत गणेश मंदिराजवळुन पुढे गेलो तेथे गिधाडे दिसली. गडाच्या दक्षिणेला आजून एक चिलखती दरवाजा असून गोलाकार बुरूज दरवाज्याचे संरक्षण करतात. तिथेच जमिनीलगत एक पाण्याचे सुबक टाके बांधुन काढले आहे, सध्या ते कोरडे पडले आहे. मग कारवीच्या दाट रानातून पच्शिमेला असलेल्या विंचुकाट्यवर गेलो. गडाची लांबी रुंदी प्रचंड असून गडाच्या मध्य भागात घनदाट झाडी आहेत त्यात जांभळाची झाडे जास्त आहेत. पिण्याचे पाणी मात्र एकाच तळ्यावर मिळते. ११ वाजत आले होते मग बरोबर आणलेले चिवडा, बिस्कीटे खाल्ली. थोडावेळ झोप काढली आणि बॅगा पाठीवर टाकून तळ्यावर गेलो. काही लोकांनी तिथे पाण्यात पोहण्याच आनंद घेतला मग लिंबु सरबत वैगैरे करून १ च्या सुमारास गड उतरण्यस सुरवात केली. फारसे कुठे न थांबता दिड तासात नारुरच्या गावमंदिरात पोहोचलो. तिथेच देवळाच्या सभामंडपात आडवे झालो. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर परतीच्या वाटेला लागलो. कणकवली - तळेरे - वैभववाडी - गगनबावडा मार्गे ८.१५ पर्यंत कोल्हापुर मागे टाकले, खांबाटकी पाशी जेवण करून रात्री १२.३० ला पुण्यात पोहोचलो.

1 comment:

bhairinath said...

Tumchi Killyanchi saphar phar chan jahali