।। श्री ।।
।। दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत ।।
"प्रस्तुत वृत्तांत असा की, पुणे मुक्कामी असलेल्या आमच्या कचेरीतील (Office) स्नेह्यांनी बहुदिवस आग्रहाचा मांडला होता. 'एखाद्या दुर्गम दुर्गाची भेट घडावी' अशी सर्वांचीच मनीषा होती. त्यावरून, विचारवंतांनी मसलत केली की, स्वराज्याची आणि श्री शिवछत्रपतींची राजधानी 'दुर्गराज रायगड' याहून श्रेष्ठ स्थान दुसरे कोणते?
दुर्गराज रायगडाच्या दर्शनाचा मनसुबा सिद्ध जाहला. तो दिवस शके १९४८, पराभव नाम संवत्सरे, ऋतू वसंत, मास चैत्र, कृष्ण पक्ष, तिथी नवमी, मंदवार (शनिवार, ११ एप्रिल २०२६) हा सुमुहूर्त निश्चित केला.
रायगड निवडीचे प्रयोजनही विशेष होते. यातील कित्येक जणांनी दुर्गांची महती केवळ ग्रंथांतूनच श्रवण केली होती, परंतु प्रत्यक्ष दर्शन घडले नव्हते. कित्येकांना आपली अर्भके (Children) सोबत घेऊन शिवचरित्राचा अनुभव घ्यायचा होता. रायगड हा पर्वत जसादुर्गम, तसाच तो वास्तूंचा खजिना! इतर दुर्गांवर न दिसणारे प्रासादांचे आणि इमारतींचे अवशेष येथे आजही साक्ष देत उभे आहेत. ज्यांची शरीरे कष्टास समर्थ आहेत, त्यांच्यासाठी 'पायवाट' आणि ज्यांना शारीरिक मर्यादा आहेत, त्यांच्यासाठी 'रज्जुमार्गाची' सोय उपलब्ध आहे, हे जाणून मोहिमेचे घाट घातले. पूर्वी केलेल्या रायगड चढाईचा आमचा अनुभव आणि साक्षात वास्तुविशारद गोपाळ चांदोरकर यांच्याकडून प्रत्यक्ष गडावर श्रवण केलेली, त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासातून उलगडलेली ऐतिहासिक महती या स्नेह्यांपर्यंत पोहोचवण्याची ही एक अपूर्व संधी आहे, असे मानून या मोहिमेचा श्रीगणेशा केला."
।। रसद आणि तजवीज ।।
"पुण्यनगरी ते दुर्गराज रायगड हे अंतर ७० कोसांच्या (१४० किमी) सुमारास भरते. येण्या-जाण्याचा हा पल्ला पार करताना वाहनधारकांचे हिशोब आणि तजवीज पाहणे अगत्याचे होते. वाहतूकदारांचे रीतीप्रमाणे ३०० किमीचे भाडे आकारले जात होते, परंतु त्यात आमचा काही अंशी तोटा दिसत होता. अशा समयी कचेरीतील एका अनुभवी कारभाऱ्याने (ज्येष्ठ सहकारी) मध्यस्थी केली आणि १०,००० सुवर्णमुद्रांच्या (रुपयांच्या) मर्यादेत हा सर्व प्रवासखर्च आणि वरखर्च बसवून दिला.
केवळ रथशाळेचीच (वाहतुकीची) नव्हे, तर तळाला मुक्कामासाठी लागणाऱ्या छावणीची (Base Camp) व्यवस्थाही त्यांनी अत्यंत माफक दरात लावून दिली. दोन खोल्यांची व्यवस्था प्रति खोली २००० या दराने झाली आणि त्याच ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पंगतीचा (थाळीचा) बेत १८० प्रति व्यक्ती असा निश्चित झाला. आता अन्नाची आणि प्रवासाची नाहक चिंता दूर झाली होती. सर्व मावळे डोळे लावून त्या ११ तारखेची वाट पाहू लागले आणि पाहता पाहता तो मंगल दिन समीप आला..."
।। दुर्गप्रेमींचा मेळा ।।
"या रायगड भेटीसाठी ठिकठिकाणच्या स्नेह्यांचा एक 'मेळा' जमला. ही काही युद्धाची तयारी नव्हती, तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेली एक 'शांतीची वारी' होती. यामध्ये:
· पुण्यनगरीतून: दीक्षित आणि त्यांचे भाचे उत्साहाने सामील झाले.
· आकुर्डी परिसरातून: गायकवाड आपल्या पत्नी आणि दोन कन्येसह या प्रवासास निघाले.
· गहुंजे पंचक्रोशीतून: चव्हाण पती-पत्नी आपल्या लहान मुलीला शिवचरित्र दाखवण्यासाठी सोबत घेऊन आले.
· भोसरी आणि मोशी प्रांतातून: जाधव भगिनी आपल्या पुत्रासह, तसेच पारखी आणि वारके हे आपापल्या अर्धांगिनीसह या यात्रेत दाखल झाले.
असे हे एकूण १५ 'दुर्गप्रेमी', संसाराच्या व्यापातून वेळ काढून, सह्याद्रीच्या कुशीत विसावण्यासाठी आणि इतिहासाची पाने प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी एकत्र आले..."
।। कूच आणि प्रस्थान ।।
"मध्यान्ह उलटल्यावर चित्त कामात लागेनासे झाले. सर्व स्नेही आपापले प्रवासाचे गाठोडे (समान) बांधून सज्ज होत होते. सूर्यास्त समीप येत असताना, साडेपाच घटिकांच्या (५:३०) सुमारास कचेरीच्या द्वाराशी रथाचे (गाडीचे) आगमन झाले. उन्हाचा कडाका ध्यानी घेऊन, प्रवासासाठी आणि गडाच्या चढाईसाठी लागणारी जलाची (पाण्याची) तरतूद आधीच करून ठेवली.
दीक्षित, गायकवाड, पारखी, वारके आणि चव्हाण ही मंडळी वेळेत हजर झाली, मात्र जाधव भगिनींच्या आगमनास काही अंशी विलंब झाला. नियोजित प्रस्थानाची वेळ टळून गेली होती आणि साडेसहाचा सुमार झाला होता. अखेर सर्व मंडळी रथात आरूढ झाली आणि प्रवासाचा श्रीगणेशा झाला. प्रवासाचा विलंब लक्षात घेऊन, तातडीने तळाला (Base Camp) सांगावा धाडला की, पोहचण्यास उशीर होईल, परंतु भोजनाची पंगत १५ जणांचीच सिद्ध (तयार) ठेवावी. असा हा शिस्तबद्ध बेत आखून आमचा ताफा रायगडच्या दिशेने मार्गस्थ झाला..."
।। मार्गाक्रम आणि आनंदोत्सव ।।
"आमच्या रथाचे सारथी (ड्रायव्हर) मोठे अनुभवी आणि जाणकार होते. हिंजवडीसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून निर्विघ्नपणे मार्ग कसा काढावा, याचे त्यांना उत्तम कसब होते. प्रवासाचा श्रीगणेशा होताच सारथी काकांनी साद घातली की, 'असे शांत काय बसलात? काही सुश्राव्य संगीत छेडा!' हे ऐकताच सर्व दुर्गप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. आधुनिक यंत्रांची (Mobile/Bluetooth) जुळवाजुळव झाली आणि गाडीत धडाकेबाज गीतांचा गजर सुरू झाला. मग काय? अबालवृद्ध सर्व मंडळी रथातच ताल धरू लागली. ड्रायव्हर काकांनी सुरुवातीलाच सर्वांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण केले. 'झटपट पटापट' पासून ते नवनवीन गीतांपर्यंत सर्वच सुरावटींवर ठेका धरला गेला. आम्हासही नृत्याचा आग्रह झाला, परंतु आमची त्या कलेत गती बेताचीच असल्याने आम्ही प्रेक्षक म्हणून आनंदी होतो.
रथ पौड परिसर सोडून मुळशीच्या अरण्याकडे वळला, तशी दुर्गम भागामुळे संगीताची साथ सुटली (Network गेले). अवघ्या वातावरणात काही काळ नीरव शांतता पसरली. मुळशी येथे रथाचा विसावा झाला. तेथे पारखी यांच्या अर्धांगिनीने आपल्या सुगृहिणीपणाची साक्ष देत अत्यंत रुचकर 'पराठे' सिद्ध (तयार) करून आणले होते. त्या पंगतीचा सर्वांनी यथेच्छ आस्वाद घेतला. सोबत चहा-कॉफीचा आस्वाद घेतल्याने कचेरीतून निघताना लागलेली क्षुधा (भूक) शांत झाली आणि शरीरात पुढील प्रवासासाठी नवा जोम संचारला..."
"मुळशीचा विसावा आटोपून आमचा रथ ताम्हिणी घाटाच्या रोखाने मार्गस्थ झाला. त्या घट्ट काळोखात मुळशीच्या विस्तीर्ण जलाशयात पलीकडच्या तीरावरील दीपांचे प्रतिबिंब एखाद्या सुवर्णकणांसारखे झळकत होते; ते दृश्य मोठे विलक्षण भासत होते. अशातच पारखी स्नेह्यांनी 'नाट्यसंगीताचा' स्वर छेडला. त्या सुरावटींनी अवघ्या वातावरणात जणू प्राण फुंकले! चहूकडे निबिड अंधार, दूरवर कोठेतरी लुकलुकणारा अंधुक प्रकाश आणि त्या शांततेचा छेद घेणारा आमच्या रथाचा ध्वनी—असा हा सर्व योग मोठा मंतरलेला होता. मनाला मोहवून टाकणारा हा प्रवास करीत, घाटाची नागमोडी वळणे लीलया पार करून आमचा ताफा 'विले' प्रांतात (MIDC) दाखल झाला..."
"विले ओलांडल्यानंतर निजामपूरचे ठाणे लागले, येथूनच दुर्गराज रायगडच्या दिशेने जाणारा नजीकचा मार्ग फुटतो. पुण्यनगरीपासून निजामपूर हे साधारण पन्नास कोसांवर (१०० किमी) असल्याने, आता केवळ १५-२० कोसांचा (३०-३५ किमी) टप्पा अवशिष्ट होता. मार्ग जरी अल्प असला, तरी तो मोठा फसववा आणि दुर्गम आहे. नागमोडी वळणे आणि चढ-उतारांमुळे सारथ्याच्या कौशल्याची मोठी परीक्षाच होती.
जसजसे आम्ही गडाच्या समीप जात होतो, तसे आमचे डोळे काळोखातही दुर्गराजाचे प्रथम दर्शन घेण्यास आतुर झाले होते. परंतु, तो निबिड अंधार भेदून काहीच दिसेनासे झाले. अखेर साडेदहा घटिकांच्या (१०:३०) सुमारास आमचा ताफा 'पाचाड' या ऐतिहासिक भूमीत दाखल झाला. पाचाडमधूनही गडाचे दर्शन घडणे दुरापास्त होते, परंतु शेवटच्या वळणावर आमचा रथ उभा ठाकला आणि साक्षात दुर्गराज रायगड समोर प्रकटला! त्यानंतर मुक्कामाच्या छावणीची (Base-Camp) पुसपास केली आणि अवघ्या काही क्षणात आम्ही विश्रांतीच्या ठिकाणी सुखरूप दाखल झालो..."
।। आतिथ्य आणि नक्षत्रांचे कौतुक ।।
"पाचाड मुक्कामी नीलम ताई औकीरकर यांच्या गृही आमचा मुक्काम ठरला होता. त्यांनी मोठ्या अगत्याने आमचे स्वागत केले. निवासासाठी दोन स्वतंत्र दालने (खोल्या) सिद्ध होती; एक पुरुषांसाठी आणि दुसरे सौभाग्यवतींसाठी. प्रवासाचा काळ आणि रात्रीची वेळ यामुळे क्षुधा (भूक) तीव्र झाली होती. विहित कर्माने हस्तप्रक्षालन उरकून आम्ही पंगतीला बसलो. तेथे गरमागरम भाकरी, अस्सल पिठले आणि मसुराची उसळ असा सात्विक बेत होता. त्यांच्या हस्तकौशल्याने बनवलेल्या 'लोणच्याने' तर जेवणाची चव अधिकच वाढवली. त्या तृप्त भोजनानंतर सर्व मंडळी आबालवृद्ध सुखावली.
भोजनानंतर आम्ही निवासाबाहेर असलेल्या मोकळ्या प्रांगणात आलो. तेथे साक्षात चंद्रमौळी चांदण्याचा लख्ख प्रकाश भूमीवर अवतरला होता. महानगरातील धुरामुळे न दिसणारे ते नक्षत्रांनी नटलेले आकाश पाहून अर्भके (मुले) विस्मित झाली. मग त्यांना आधुनिक यंत्राच्या (Mobile App) साह्याने नभमंडळातील ग्रह-ताऱ्यांची ओळख करून दिली. समोर तळपणारा तो तेजस्वी गोळा म्हणजे 'गुरु' (Jupiter) ग्रह आहे हे उमजताच, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जणू काही त्यांना नभातील खजिनाच गवसला! परंतु, दुसऱ्या दिवशीच्या मोहिमेसाठी देहास विश्रांतीची निकड होती. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर, म्हणजेच तीन घटिका (३:००) रात्री असताना उठण्याचा दंडक घालून आम्ही निद्रेच्या आधीन झालो..."
।। अंतराल: ( चित्तातील द्वंद्व )।।
"छावणीत शांतता पसरली आणि सर्व स्नेही निद्रेच्या आधीन झाले, परंतु आमच्या नयनी निद्रा नव्हती. मनामध्ये विचारांचे काहूर माजले होते—हे सर्व मावळे समयी जागे होतील का? सुकुमार अर्भके आणि भगिनींना या निबिड अंधारात पल्ल्यावर नेणे धाडसाचे तर ठरणार नाही ना? दिनकर उगवण्यापूर्वी दुर्गराजाचे दर्शन घडेल का? वाटेत कोणाचे धैर्य खचले तर काय करावे? असे अनेक तर्क-वितर्क मनात घोळत होते. अशा समयी समर्थांच्या ओळींचे स्मरण झाले आणि चित्ताला उभारी मिळाली:
मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥
येविसीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥१॥
No comments:
Post a Comment